संजय राऊत यांनी विधिमंडळाबाबत काढलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल विधिमंडळात गदारोळ…!

विधानपरिषद , मुंबई : संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य हे विधिमंडळाचा घोर अपमान करणारं असून विधिमंडळातील सदस्यांनी याचा एकमताने निषेध करून असा अपमान खपवून घेणार नाही असा संदेश विधिमंडळाने देणं आवश्यक आहे असं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आणि राऊत यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली.

यशवंतराव चव्हाण यांच्यापासून या विधीमंडळाची आदर्श परंपरा आहे या विधीमंडळाबद्दल अशाप्रकारे म्हणणं हे समर्थनीय नाही आज जर याविरोधात संदेश दिला नाही तर विधीमंडळाचा अपमान करणारे हजारो संजय राऊत निर्माण होतील असं फडणवीस म्हणाले. विधिमंडळाचा अपमान केला तर हक्कभंग हे आयुध असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

उपसभापती नीलम गोर्हे यांनी हे वक्तव्य तपासून हक्कभंगाबाबत निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र अटक करण्याबाबत राज्य सरकारचा अधिकार आहे माझा नाही, असं उपसभापतींनी स्पष्ट केलं.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या हे वक्तव्य समर्थनीय नाही असं सांगत हे वक्तव्य त्यांनी कोणत्या पार्श्वभूमीवर आणि कोणासाठी म्हटलं हे तपासून पाहण्याची मागणी केली. मात्र विरोधकांना देशद्रोही म्हणणाऱ्यांवर काय कारवाई करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी झालेल्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं.