Home अपराध विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी नगरसेविका, तिचा पती व मुलगा यांचे विरुद्ध देवगड पोलिसांत...

विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी नगरसेविका, तिचा पती व मुलगा यांचे विरुद्ध देवगड पोलिसांत गुन्हा दाखल.

4222

कणकवली : देवगड येथील शुभम शामसुंदर जोशी या कॉलेज युवकाला शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी नगरसेविका सौ. प्रणाली माने, त्यांचे पती मिलिंद माने व मुलगा आर्य माने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला ही घटना 11 ऑक्टोबर रोजी दुपारी ४:३० च्या सुमारास तुळशीनगर येथील वेदांत बिअर शॉपीजवळ घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवगड कनिष्ठ महाविद्यालयात शुभम शामसुंदर जोशी (इयत्ता अकरावी सायन्स ब) वर्गात शिकत आहे तर आर्य मिलिंद माने हा (अकरावी सायन्स अ) वर्गात शिकत आहे. 11 ऑक्टोबर रोजी साडेचार वाजता कॉलेज सुटल्यानंतर शुभम हा तुळशीनगर येथील परशुराम अपार्टमेंटजवळ असलेल्या वेदांत बियर शॉपीनजीक मित्रांसोबत गप्पा मारत उभा असताना त्याचा मित्र साहिल चव्हाण यांच्या फोनवर मिलिंद माने यांनी आपण शुभमचे मित्र बोलत आहे. मला शुभम सोबत बोलायचे आहे, असे सांगितल्याने साहिलने फोन शुभम यांच्याकडे दिला. त्यावेळी समोरून मिलिंद माने यांनी शिवीगाळ करून तू कुठे आहे, ते सांगा असे बोलून अचानक गाडी क्रमांक MH 07 1212 ही हुंडाई आय 10 गाडी घेऊन येऊन शुभम हा गप्पा मारून निघत असताना त्याला अडवून त्याच्या कानशिलात मारले, व गुडघ्यावर आपटले. त्यावेळी शुभमच्या मित्रांनाही दम दिला. तर गाडीतून आर्य माने हा बेसबॉल व हॉकी स्टिक घेऊन खाली उतरला व त्याने वडिलांच्या हातात दिली. ती बेसबॉल बॅट मिलिंद माने यांनी शुभमच्या खांद्यावर मारली तर आर्य माने यांनी शुभमच्या कंबरेवर हॉकी स्टिकने मारले. त्यावेळी सोबत आलेली मिलिंद माने यांची पत्नी नगरसेविका यांनी या मारामारीचे व्हिडिओ शूटिंग करत त्याला चांगलाच चोप द्या, असे सांगून दोघांनीही त्याला ठार मारून टाकू, कळणार नाही, अशी धमकी दिली व गाडी घेऊन पळून गेले. हा प्रकार शुभम यांनी त्याची आई सौ. शामल शामसुंदर जोशी वडील अँड. शामसुंदर जोशी यांना सांगितल्यावर त्यांनी ग्रामीण रुग्णालयात नेवून त्याच्यावर उपचार केले.  शामल जोशी यांनी देवगड पोलीस स्थानकात मुलाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी नगरसेविका सौ प्रणाली माने, मिलिंद माने व आर्य माने या तिघांविरुद्ध भादवि कलम 324, 323, 341, 504, 506 507, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.