वैभववाडी बाजारपेठेत राजरोसपणे सुरु असलेले मटका व इतर अवैध धंदे करा, उबाठाकरे शिवसेना पक्षाचे पोलिसांना निवेदन
वैभववाडी बाजारपेठेत राजरोसपणे मटका व इतर अवैध धंदे सुरू आहेत. याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. तरुण पिढी बरबाद करणारे हे धंदे तात्काळ बंद करावेत अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने धंद्याची पोलखोल करण्याचा इशारा निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षक वैभववाडी यांना देण्यात आला आहे.
वैभववाडी शहरांमध्ये गेले अनेक महिने स्टॉल लावून राजरोसपणे मटका सुरू आहे. परंतु अवैध धंदे बंद करण्यासाठी आपले पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. या बेकायदेशीर धंद्याबाबत वेळोवेळी आपल्याकडे लेखी तक्रार देऊन सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. कालच जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः कणकवली येथे मटका व जुगार धंद्याची पोलखोल केली आहे. परंतु त्यांनी केलेली पोलखोल ही काही दिवसांपूर्वी मर्यादित न ठेवता अशा प्रकारचे बेकायदेशीर धंदे कायमस्वरूपी बंद झाले पाहिजे व वेळोवेळी आपल्याकडून त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. तरच या धंद्यांना आळा बसू शकतो. या बेकायदेशीर धंद्यामुळे तालुक्यातील युवा पिढी व कुटुंबाच्या कुटुंबे बरबाद होत चालली आहेत. याला जबाबदार कोण असा सवाल केला जात आहे. यावेळी तालुकाप्रमुख मंगेश लोके उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे तालुका युवा प्रमुख रोहित पावसकर रामदास पावसकर माजी सभापती लक्ष्मण रावराणे पल्लवी झिमाळ काझी आदी उपस्थित होते .