देवगड (प्रतिनिधी)
कणकवलीत मटका अड्ड्यावर टाकलेली धाड हेतू पुरस्कृत – सुशांत नाईक
धाड टाकून आपल्या सरकारचे गृहखाते किती निष्क्रिय आहे हे दिले दाखवून युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची पत्रकार परिषदेत माहिती
अवैध धंद्यावर कारवाई व्हावी यासाठी सहा महिन्यांपूर्वी आम्ही आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. कोणत्याही परिस्थितीत अवैध धंदे बंद झाले पाहिजेत, ही आमची ठाम भूमिका आहे. योग्य प्रकारे कारवाई झाली तर आमचे सहकार्य प्रशासनाला मिळेल.
कणकवली येथे पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेल्या मटका अड्ड्यावरील धाडीवर टीका करताना नाईक म्हणाले, “ही कारवाई हेतूपुरस्सर होती. आरोपींना पाच ते सहा तासांत जामीन मिळाला. हे सगळे फक्त दिखाव्यासाठी आहे. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचे दारू अड्डे आहेत, त्यावर धाड घालण्याचे धैर्य दाखवावे.”असे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कणकवली युवासेना जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक यांनी व्यक्त केले.
देवगड येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नाईक बोलत होते. यावेळी तालुका प्रमुख रवींद्र जोगल, युवासेना प्रमुख गणेश गावकर, महिला आघाडी प्रमुख हर्षा ठाकूर, नगरसेवक तेजस मामघाडी, काका जेठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान मंत्री राणे पुढे म्हणाले की, पालकमंत्री राणे यांनी कणकवलीतील धाड टाकून आपल्या सरकारचे गृहखाते किती निष्क्रिय आहे हे दाखवून दिले आहे. जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक व पोलीस अधिकारी जुमानत नाहीत म्हणूनच पालकमंत्र्यांना कारवाई करावी लागत आहे. भाजपचे काही पदाधिकारी गोवा बनावटीची दारू विक्री करत असल्याचे आम्ही प्रशासनाला आधीच कळवले आहे. त्यांच्यावर कारवाई करून दाखवावी, असे आव्हानही त्यांनी दिले.
तसेच देवगड-जामसंडे नगरपंचायत कोंडवाड्यात १५ दिवसांपूर्वी झालेल्या गाईच्या मृत्यूवरही संताप व्यक्त केला. “नगरपंचायत प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे गाईचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुख्याधिकारी व सत्ताधारी दोषी आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही नगरपंचायतीसमोर आंदोलन उभारू,” असा इशाराही त्यांनी दिला. यासंदर्भात नगरसेवक तेजस मामघाडी यांनी तक्रार दाखल केली असून सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली. “हिंदुत्वाचा बॅनर घेऊन फिरणारे पालकमंत्री गाईच्या मृत्यूबाबत मौन बाळगतात, हे दुर्दैवी आहे. आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत आणि या प्रकरणात ठोस निर्णय घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,” असेही यावेळी सुशांत नाईक यांनी सांगितले.





