धनगरवाड्याची तहान भागवणारे ‘खरे हीरो’; नितेश राणे, दिलीप रावराणे आणि सिद्धेश रावराणेंच्या पुढाकाराने पाणीपुरवठा सुरळीत

1

वैभववाडी ( तुषार शिंगाडे)

आचिर्णे येथील धनगरवाडा वासियांसाठी आमदार तथा पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे आणि वैभववाडी पंचायत समितीचे सभापती सिद्धेश (बंटी) रावराणे हे खऱ्या अर्थाने ‘हीरो’ ठरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नळपाणी योजनेच्या विहिरीतील मोटार बंद पडल्याने धनगरवाड्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र लोकप्रतिनिधींनी तातडीने दखल घेत समस्या सोडवल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

धनगरवाड्यातील नागरिकांनी एकत्रित बैठक घेऊन या गंभीर समस्येबाबत जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे आणि सभापती सिद्धेश (बंटी) रावराणे यांची भेट घेतली. ग्रामस्थांनी मोटार बंद पडल्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. यावेळी दोन्ही नेत्यांनी या प्रश्नाची जबाबदारी स्वीकारत तातडीने पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी चर्चा केली.

चर्चेनंतर कोणताही विलंब न करता निधीतून नवीन मोटार आणि नवीन पाईप उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. दिलेल्या आश्वासनाप्रमाणे अल्पावधीतच नवीन मोटार व पाईप धनगरवाड्यात पोहोचविण्यात आले. त्यामुळे अनेक दिवसांपासून रखडलेली पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.

दरम्यान, गुरुवारी (११ जून २०२६) आचिर्णे धनगरवाड्यातील ग्रामस्थांनी प्रशासक सरपंच वासुदेव रावराणे यांच्या सहकार्याने नवीन मोटार विहिरीत बसवली. तसेच फुटलेले पाईप दुरुस्त करून जोडण्यात आले. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा तातडीने सुरू करण्यात आला. त्यामुळे धनगरवाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या तात्काळ आणि लोकाभिमुख कार्याबद्दल आचिर्णे धनगरवाडा वासियांनी पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, सभापती सिद्धेश (बंटी) रावराणे तसेच प्रशासक सरपंच वासुदेव रावराणे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेत त्वरित कार्यवाही करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या भूमिकेचेही त्यांनी कौतुक केले.