इंग्रजी माध्यमाबाबत पालकांनी मानसिकता बदलणे गरजेचे : खा. विनायक राऊत

देवगड : जिल्हा परिषदांच्या किंवा मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थी मिळणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. या शाळा चालवायच्या आणि वाचवायच्या कशा? हा सर्वांसमोर प्रश्न आहे. आपला पाल्य इंग्रजी माध्यमांच्या शाळेतच शिकला पाहिजे ही पालकांची मानसिकता बदलली पाहिजे. मातृभाषेतून शिक्षण घेणे कमीपणाचे समजू नका. मातृभाषेतून शिक्षण घेऊनही यशाची उत्तुंग शिखरे पार करता येतात. आपल्या मातृभाषेची तुलना संत ज्ञानेश्वरांनी अमृताशी केली आहे. ही भाषा समृद्ध विचारांची व आदर्श निर्माण करणारी आहे. देशातील थोर कर्तृत्ववान व्यक्ती माजी राष्ट्रपती थोर शास्त्रज्ञ डॉ.एपीजे अब्दुल कलाम, विद्यमान महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपापल्या मातृभाषेतूनच शिक्षण घेऊन उच्च पदावर विराजमान झाले आहेत. असे मत खासदार विनायक राऊत यांनी देवगड तालुक्यातील हिंदळे मोर्वे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक जीवन शिक्षण शाळेचा शतक महोत्सवी सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले की, इंग्रजांच्या राजवटीत अन्याय, अत्याचार सहन करीत दुर्गम भागात मराठी शाळा सुरू करणे आणि ती चालवणे हे सहज शक्य नव्हतं. शिक्षणाने प्रगती होते. उद्याचा सूर्योदय नव्या पिढीसाठी भाग्योदय ठरेल अशी पूर्वजांची व्यापक दूरदृष्टी होती. पूर्वजांचा वारसा, शिक्षण क्षेत्रातील योगदान नवी पिढीही विसरली नाही ही बाब गौरवास्पद आहे .
आपण मोठे होत असताना आपल्या पाठीमागे वाड-वडिलांची पूर्व पुण्याई असते पूर्वजांची पुण्याई शिक्षण रूपाने या गांवाला लाभली आहे. पूर्वजांनाही समाधान वाटेल असा एकजुटीने हा शतक महोत्सवी कार्यक्रम साजरा व्हावा.पूर्वजांचा शिक्षणरूपी वारसा नव्या पिढीनेही समर्थपणे पुढे न्यावा बाब कौतुकास्पद आहे.

गांवाच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण जेव्हा जेव्हा साद घालाल त्यावेळी तुमचा सहकारी म्हणून सकारात्मक प्रतिसाद देईन असे आश्वासन यावेळी खासदार राऊत यांनी दिले.

गावच्या विकासासाठी योगदान दिलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचा सन्मान यावेळी खासदार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.शाळेच्या प्रवेशव्दारातील कारंजे,आय लव मोर्वे हा सेल्फी पॉईंट तसेच शाळेच्या इमारतीस आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

कार्यक्रमास व्यासपीठावर देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू, नगरसेवक निवृत्ती (बुवा) तारी, विशाल मांजरेकर, रोहन खेडकर, शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद साटम, माजी पंचायत समिती सभापती सुनील पारकर, रविंद्र जोगल, सरपंच मकरंद शिंदे, उपसरपंच रुपेश राणे, प्रकाश सरवणकर, नामदेव बापर्डेकर, मंगेश मयेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शतक महोत्सव समितीचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आदी मान्यवर उपस्थित होते.