महिला प्रीमियर लीगचे सामने मुंबईत…!

नवी दिल्ली : अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या महिला प्रीमियर लीगला (डब्ल्यूपीएल) मार्च महिन्याचा मुहूर्त मिळाला असून, ४ ते २६ मार्चदरम्यान ही स्पर्धा फक्त मुंबईत पार पडणार आहे. लीगमधील सामने ब्रेबॉर्न आणि डी. वाय. पाटील स्टेडियमवर पार पडतील.

स्पर्धेचा कार्यक्रम अजून निश्चित नसला तरी गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स संघांदरम्यान उद्घाटनाचा सामना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महिला प्रीमियर लीग ४ ते २६ मार्चदरम्यान मुंबईत पार पडेल, अशी माहिती इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) कार्याध्यक्ष अरुण धुमल यांनी दिली. या लीगसाठी अलीकडेच संघांचा लिलाव झाला असून, यामध्ये गुजरात संघावर अदानी समूहाकडून सर्वात मोठी बोली लावली होती. आता खेळाडूंच्या लिलावाची प्रतीक्षा असून, हा लिलाव महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यानंतर म्हणजेच १३ फेब्रुवारीला मुंबईत होणार असल्याचेही धुमल यांनी सांगितले.