मुंबई : काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. याबाबत नाना पटोले यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. “असं काहीही झालेलं नाही”, असं मत नाना पटोलेंनी व्यक्त केलं. तसेच थोरातांचा आणखी राजकीय उत्कर्ष होवो अशा वाढदिवसाच्या सदिच्छा दिल्या. ते मंगळवारी (७ फेब्रुवारी) माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
नाना पटोले म्हणाले, “आज बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस आहे. त्यांना मी सदिच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो. त्यांचा आणखी राजकीय उत्कर्ष होवो अशा मी सदिच्छा देतो. बाकी राहिला विषय बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याचा, तर त्यांनी राजीनामा दिलेला नाही.”
“आमच्याकडे बाळासाहेब थोरातांचा कोणताही राजीनामा आलेला नाही”
“१५ फेब्रुवारीच्या कार्यकारणी बैठकीत पक्षातील घडामोडींवरही चर्चा केली जाईल. आमच्याकडे बाळासाहेब थोरातांचा कोणताही राजीनामा आलेला नाही. माध्यमं काँग्रेसबाबत फार चिंता करत आहेत,” असंही नाना पटोलेंनी म्हटलं.





