वेंगुर्ले : तालुक्यातील भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार सोमवार दिनांक २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता साईमंगल कार्यालय, सुंदरभाटले येथे आयोजित केला आहे. वेंगुर्ले तालुक्यातील २३ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा ने जोरदार मुसंडी मारत १३ सरपंच व १६ उपसरपंच विजयी करत तालुक्यामध्ये एक नंबरचा पक्ष असल्याचे दाखवून दिले. या सर्वांचा सत्कार समारंभ जिल्हाध्यक्ष राजन तेली, लोकसभा प्रवास योजनेचे संयोजक अतुल काळसेकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघ जिंकण्यासाठी ” लोकसभा प्रवास योजना ” अंमलात आणली आहे . या योजनेअंतर्गत प्रत्येक बुथवर एक प्रवासी कार्यकर्ता तयार करून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रचना तयार करण्यात येणार आहे . अशा वेंगुर्ले तालुक्यातील ९३ बुथ वरील प्रवासी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण लोकसभा प्रवास योजनेचे संयोजक अतुल काळसेकर देणार आहेत . या बैठकीत बुथ अध्यक्ष व शक्ती केंद्र प्रमुख सुद्धा उपस्थित रहाणार आहेत. तरी वेंगुर्ले तालुक्यातील भाजपच्या सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.




