खळबळजनक… लातूरच्या विद्यार्थ्याची कोट्यात सहाव्या मजल्यावरुन उडी ; ६ तासांत २ मुलांनी संपवलं जीवन.

136

कोटा : कोटामध्ये ६ तासांत NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलीये. त्यामुळे कोटामधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबताना दिसत नाहीये. वर्षभरात आतापर्यंत एकूण २४ विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलंय. त्यामुळे परीक्षेच्या तयारीसाठी कोटा येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे सत्र गंभीर असून यावर काहीतरी उपाय करण्याची गरज निर्माण झाली आहे.

अविष्कार संभाजी कासले (वय १८) आणि आदर्श राज (वय १८) हे NEET परीक्षेची तयारी करत होते. माहितीनुसार, अविष्कारने परीक्षा दिल्यानंतर काही तासांत सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. सदर घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ही घटना दुपारी चारच्या सुमारास घडली होती.

काही तासानंतर बिहारचा रहिवाशी असलेला आदर्श राज याने परीक्षा दिल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री सातच्या सुमारास त्याचा मृतदेह त्याच्या खोलीत आढळला. दाव्यानुसार, परीक्षेमध्ये कमी गुण मिळतील या भीतीने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. सदर दोन्ही घटनांमुळे शहरामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

अविष्कार कासले हा महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील विद्यार्थी आहे. अविष्कार NEET ची तयारी तीन वर्षांपासून करत होता. तालेवाडी येथे आजी-आजोबांसोबत तो भाड्याच्या घरी राहात होता. त्याचे वडील महाराष्ट्रातील सरकारी शाळेत शिक्षक आहेत. दोन्ही मुलांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिस याप्रकरणात अधिक तपास करत आहेत.