जगज्जेतेपदाचा फैसला आज..! ; प्रज्ञानंद – कार्लसन यांच्यात पहिला डाव ड्रॉ.

41

नवी दिल्ली : भारताचा युवा बुद्धिबळपटू रमेशबाबू प्रज्ञानंद आणि ‘नंबर वन’ खेळाडू नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन यांच्यातील फिडे वर्ल्ड कप बुद्धिबळ स्पर्धेतील विजेतेपदाच्या लढतीतील पहिला डाव ड्रॉ झाला. 35 चालीनंतर उभय खेळाडूंनी डाव बरोबरीत सोडण्याचे मान्य केले. आता बुधवारी निर्णायक क्लासिकल डावात जेतेपदाचा फैसला रंगणार आहे.

भारताच्या 18 वर्षांच्या आर. प्रज्ञानंदने पांढर्‍या सोंगट्या घेऊन खेळताना अनुभवी मॅग्नस कार्लसनला जबरदस्त टक्कर दिली. सुरुवातीला आघाडीवर असलेल्या प्रज्ञानंदने कार्लसनचे टेन्शन वाढवले होते. मात्र नॉर्वेच्या या खेळाडूने आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत पिछाडी भरून काढत डाव ड्रॉ केला. प्रज्ञानंदने पहिल्या रॅपिड गेममध्ये सुरुवातीला आघाडी घेतली होती. तो वेळेच्या पुढे होता, तर कार्लसन त्याचा वेळ घेत होता. भारताचा युवा बुद्धिबळपटूने त्याच्यावर चांगलाच दबाव ठेवला होता. नियमानुसार दोन्ही बुद्धिबळपटूंना 1 तास 30 मिनिटांत 40 चाली खेळायच्या असतात. मात्र कार्लसनच्या पहिल्या तासाभरात केवळ 13 चाली झाल्या होत्या. मात्र त्यानंतर प्रज्ञानंद हा 15 व्या चालीनंतर मागे पडला. यादरम्यान दोन्ही बुद्धिबळपटूंनी आपल्या क्वीन्स गमावल्या. डावाची चांगली सुरुवात करणारा प्रज्ञानंद जसजसा वेळ संपू लागला त्यावेळी तसतसा तो मागे पडला. त्यामुळे अखेर पहिला डाव हा ड्रॉ झाला.

आता विजेतेपदाच्या लढतीतील दुसरा डाव हा बुधवारी होणार आहे. जर या डावातदेखील निर्णय झाला नाही तर टायब्रेकर सामना खेळवला जाईल. प्रज्ञानंद आणि कार्लसन यांच्यातील हा 20 वा सामना आहे. यात कार्लसन थोडासा आघाडीवर आहे. प्रज्ञानंदने यापूर्वीही अग्रमानांकित मॅग्नस कार्लसनला पराभूत केलेले आहे. हेड टू हेडमध्ये दोघेही एकमेकांना चांगलीच टक्कर देत आहेत. विशेष म्हणजे कार्लसनला एकदाही एफआयडीई वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. त्यामुळे आजच्या लढतीकडे तमाम बुद्धिबळप्रेमींच्या नजरा असतील.