देवगड : जल जीवन मिशन अंतर्गत ग्राम पाणी पुरवठा स्वच्छता समिती सदस्य व ग्रामपंचायत स्तरावरील भागीदार यांचे दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण शिरगांव ग्रामपंचायत सभागृहात संपन्न झाले. यावेळी मार्गदर्शन करताना मनुष्यबळ विकास समन्वयक श्रीम. इंदिरा परब म्हणाल्या, शासन ग्रामीण भागात पाणी पुरवठ्याच्या सुविधा निर्माण करण्यासाठी , सेवा पातळी निर्देशांकानुसार शाश्वत पाणी पुरवठा होण्यासाठी व त्याचा निरंतर वापर होण्यासाठी गावपातळीवरील ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती कार्यक्षमपणे कार्यरत असणे आवश्यक आहे . यासाठी जल जीवन मिशन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती यांचे प्रशिक्षण महत्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी क्षमता बांधणी व समुदाय विकास तज्ज्ञ रूपाली किनळेकर यांनी जल जीवन मिशन व पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची भुमिका याबाबत मार्गदर्शन केले. तसेच समाजशास्त्र तज्ज्ञ भगवान चव्हाण यांनी पाणी पुरवठा योजनेचे संचालन , देखभात व दुरुस्ती आणि सुयोग्य व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले तर पाणी गुणवत्ता समन्वयक नागेश तोरस्कर यांनी पाणी गुणवत्ता व्यवस्थापन व सर्वेक्षण आणि सुरक्षित पाणी पुरवठा याबाबत मार्गदर्शन केले .
या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी शिरगांव ग्रामपंचायत सदस्य मंगेश धोपटे, आरोग्य विस्तार अधिकारी श्रीम .प्रतिमा वळंजु, ग्रामविकास अधिकारी दिनेश चव्हाण, ग्रा.प. सदस्य श्रीम . वैष्णवी आईर उपस्थित होते.
समारोप प्रसंगी शिरगाव गावचे सरपंच समीर शिरगांवकर, गट समन्वयक वैशाली मेस्त्री, ग्रा. प. सदस्य संतोषकुमार फाटक, ग्रां.प. सदस्य मंगेश धोपटे, ग्रा.प सदस्य श्रीम. वैष्णवी आईर उपस्थित होते. या प्रशिक्षणाला देवगड तालुक्यातील १७ गांवातील ग्राम पाणी पुरवठा सदस्य , आशा , अंगणवाडी सेविका, बचतगट प्रतिनिधी सहभाग होते . या प्रशिक्षणार्थीना सरपंच समीर शिरगांवकर व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .
या प्रशिक्षणाचे सुत्रसंचालन विनायक धुरी तर आभार ग्रामविकास अधिकारी दिनेश चव्हाण यांनी केले .





