थलायवाची क्रेझच न्यारी! ; ‘जेलर’ बघण्यासाठी चेन्नई – बंगलोरमध्ये कंपन्यांना सुट्टी जाहीर!

66

चेन्नई : रजनीकांतच्या जेलर सिनेमाची सध्या सगळीकडे प्रचंड क्रेझ आहे. रजनीकांतचा सिनेमा जेव्हा जेव्हा येणार असतो तेव्हा त्याचा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये एक – दोन महिने आधीपासूनच सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण होते. आता रजनीकांत यांच्या सिनेमाची चेन्नई – बंगलोरमध्ये किती क्रेझ आहे, याचा नुकताच अनुभव आलाय.

चेन्नई – बंगलोरमध्ये रजनीच्या फॅन्सना आनंदाची बातमी

10 ऑगस्ट रोजी रिलीज होणारा रजनीकांतचा ‘जेलर’ हा चित्रपट संपूर्ण भारतात बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग करेल अशी अपेक्षा आहे. रजनीकांत जवळपास 2 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. चेन्नई – बंगलोरमधील त्याच्या फॅन्सना आनंदाची बातमी मिळालीय.

चेन्नई आणि बंगलोरमधील अनेक कंपन्यांनी 10 ऑगस्ट रोजी कर्मचाऱ्यांसाठी सुट्टी जाहीर केली आहे. याआधी प्रोमो आणि ट्रेलरमुळे या चित्रपटाने आधीच चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. सुपरस्टार रजनीकांतचा ‘जेलर’ फिव्हर न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरवर पोहोचला आहे. ‘जेलर’ला सर्वाधिक स्क्रीन्स मिळण्याची आशा आहे.

जेलरचा ट्रेलर

वयाची सत्तरी पार केल्यानंतरही रजनीकांत यांचा जलवा कायम आहे. त्यांची ती स्टाईल, संवादफेकीची ढब, त्यांचे दिसणे कमालीचे प्रभावी आहे. जेलरमधून त्याची वेगळी झलक आपल्यासमोर येते. त्यामध्ये रजनीकांत यांनी एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली असून आपल्या धाडसी व्यक्तिमत्वाचा परिचय त्यांनी या जेलरच्या माध्यमातून करुन दिला आहे. प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध याच्या संगीतानं तर चाहत्यांना प्रभावित केलं आहे.