मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील ‘मातोश्री’ बंगल्याच्या आवारात विषारी जातीचा साप आढळल्याची माहिती समोर आली. यानंतर त्वरीत सर्प मित्रांना बोलवण्यात आले. या सापाला रेस्क्यू करून त्याला जंगलात सोडण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्प मित्रांचे आभार मानले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी कोब्रा जातीचा विषारी नाग सापडला. रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कलानगर बांद्रा पूर्व येथील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावरून वाईल्ड लाईफ ॲनिमल प्रोटेशन ॲन्ड रेस्क्यू असोशिएशन संस्थेला फोन आला होता.
फोनवरती त्यांनी मातोश्री बंगल्याच्या आवारात एक नाग फिरत आहे. त्यासाठी आम्हाला सर्पमित्राची मदत हवी आहे, असे सांगण्यात आले.
फोन येताच सर्पमित्र अतुल कांबळे हे मातोश्री निवासस्थानी गेले. त्या ठिकाणी हा नाग पाण्याच्या टाकीमागे बसलेला होता. हा ‘कोब्रा’ या विषारी जातीचा नाग असून त्याची लांबी अंदाजे ४ फूट होती. हा साप रेस्क्यू करून त्याची माहिती ठाणे वनविभागाच्या कंट्रोल रूमला देण्यात आली.
त्या हद्दीतील अधिकारी रोशन शिंदे यांना फोन करून ही माहिती कळवली. हा नाग हा पूर्णपणे व्यवस्थित आहे. त्यामुळे त्याला वनविभागाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे जंगलात सोडण्यात आले, अशी माहिती देण्यात आली आहे.





