पाकिस्तानमध्ये हजारा एक्सप्रेसला अपघात ; २५ लोकांचा मृत्यू!

74

रावळपिंडी : पाकिस्तानमध्ये मोठा रेल्वे अपघात झाला आहे. पाकिस्तानी माध्यमांनुसार, रावळपिंडीवरुन निघणाऱ्या हजारा एक्सप्रेसचे ८ डबे रुळावरुन घसरले. या अपघातामध्ये आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

शंभराहून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. हा रेल्वे अपघात सहारा रेल्वे स्टेशनजवळ झाला. हे रेल्वे स्टेशन शहजादपुर आणि नवाबशाह या स्थानकांमध्ये स्थित आहे.

जवळच्या रुग्णालयात इमर्जंसी घोषित

अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना नवाबशाह येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. ट्रेनचे डबे रुळावरुन कसे घसरले याबद्दल खुलासा होऊ शकला नाही. याबाबत अधिकारी तपास करत आहेत.

पाकिस्तानी माध्यमांनी रेल्वेचे डिव्हिजनल सुपरीटेंडेंट सुकुर मोहम्मद रेहमान यांच्या हवाल्यातून सांगितले की एकूण ८ डबे रुळावरुन उतरले आहे. पोलिसांनी सांगितले की जखमींना डब्ब्यातून काढण्यात आले आहे आणि जवळच्या रुग्णालयांमध्ये इमर्जंसी घोषित करण्यात आली होती.

भारतामध्येही यावर्षी मोठ्या ट्रेन दुर्घटना

ओडिशा राज्यातील बालासोर येथे भीषण दुर्घटना घडली होती. यावेळी तीन ट्रेन एकमेकांमध्ये टक्कर झाल्याने मोठा अपघात झाला होता. या घटनेमध्ये जवळपास ३०० लोकांचा मृत्यू झाला होता आणि १२०० पेक्षा जास्त लोकं जखमी झाले होते. या घटनेवर देशभरातील नागरिकांकडून शोक व्यक्त करण्यात आला होता.

या घटनेची सखोल माहिती मिळवण्यासाठी हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. सीबीआयने तपास केल्यानंतर या घटनेसाठी जबाबदार अधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खटला चालवला होता.