कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे सुरू झाली आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी विहिरींच्या खोदाईसाठी भूगर्भात लागलेले खडक फोडण्याकरिता सुरुंग लावले जातात. त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जिलेटिनचा परवाना व अन्य कायदेशीर बाबींची तपासणी करण्यासाठी दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सक्रिय झाल्याची माहिती मिळाली आहे. कणकवली तालुक्यातील एका गावातील जलजीवन मिशनच्या विहिरीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी या पथकाने दुपारी अचानक भेट देत चौकशी केली. या चौकशी दरम्यान त्या विहीर खोदाई करणाऱ्या संबंधितांकडील जिलेटीनच्या कांड्याही ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.
सदर स्फोटके बाळगण्यासाठी परवाना आहे का ? यासह अन्य चौकशी करत परवान्याचीही खातरजमा केली व उर्वरित कागदपत्रे सादर करण्याबाबत सूचना दिल्याचे समजते. याबाबत या दहशतवाद विरोधी पथकाच्या एका कर्मचान्याकडे या कारवाईबाबत चौकशी केली असता त्यांनी आम्ही मुंबईहून आल्याचे सांगितले.
मात्र, तुमचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रमुख कोण? कार्यालय कुठे याबाबत विचारणा केली असता त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यांनी मुंबई कार्यालयाकडून चार कर्मचारी सिंधुदुर्गासाठी देण्यात आले आहेत व हे कर्मचारी अशी अचानक तपासणी करू शकतात, अशी माहिती दिली.
मात्र, दहशतवाद विरोधी पथकाचा गावच्या विकास कामामधील एक घटक असलेल्या व ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींच्या कामाच्या ठिकाणी आकस्मिक भेटी देऊन तपासणी करण्याचा हा उद्देश आहे का ? नेमके या पथकाकडून शासनाला अजून काही वेगळी कारवाई अपेक्षित आहे का ? ज्या उद्देशाने ही पथके कार्यरत करण्यात आली तो उद्देश निश्चितपणे साध्य होतोय का ? असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. जिल्ह्यात दहशतवाद विरोधी पथक जर विहिरींच्या कामांवर व्हिजिट करायला लागले तर जलजीवन मिशनची कामे या अशा कारवाईच्या ससेमिऱ्याने वेळेत पूर्ण होतील का? याचा विचार आता सिंधुदुर्ग जि.प. प्रशासन करणार का ?





