….पण मला साधं निमंत्रण नसल्याचं दुःख : अंकुश जाधव

226

दोडामार्ग : जि. प. सिंधुदुर्गचा सदस्य व रुग्णकल्याण समितीचा अध्यक्ष असताना प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी तसेच नाटळ सांगवे व सांगेली या प्रथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती कर्तव्य म्हणून राज्य सरकार कडून एन. एच. आर. एम मधून मंजूर करून आणल्या. मात्र यांच्या लोकार्पण कार्यक्रमास तत्कालीन लोकप्रतिनिधी म्हणून मला आमंत्रण नसणे हे वेदनादायी असल्याचे जि. प. माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी म्हटले आहे. उदघाटन कोणीही करा मात्र ज्याने काम मंजूर करून आणलं त्याला त्याचं थोडातरी श्रेय द्या असाही हल्लाबोल त्यांनी आपल्या विरोधकांचे नाव न घेता केला. प्रशासनाने तरी याचा विचार करायला हवा होता व स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून निमंत्रण द्यायला हवे होते असे ते म्हणाले.

आपल्या भागातील लोकांसाठी आरोग्य केंद्राची ही इमारत उभी राहिली याचा आपल्याला आनंद असून तत्कालीन जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत व रेश्मा सावंत तसेच जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. साळे यांनीही या कामी मदत केल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या भागातील लोकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने मी केलेल्या या इमारत रुपी कामाचं मला समाधान असून यातून चांगल्या आरोग्य सुविधा येथील ग्रामस्थांना मिळतील असेही ते यावेळी म्हणाले. चांगल्या कामाचे नेहमीच दुसरे श्रेय घेतात. साटेली भेडशी आरोग्य केंद्र इमारती संदर्भातही तेच झाले मात्र आपण आपल्या तालुका वासीयांसाठी कायम झटत राहू असेही अंकुश जाधव यांनी शेवटी स्पष्ट केले.