Home महाराष्ट्र कणकवली एसटी प्रवासात धक्कादायक चोरी! महिलेच्या पर्समधील ४.२० लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

एसटी प्रवासात धक्कादायक चोरी! महिलेच्या पर्समधील ४.२० लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

49
Oplus_16908288

तेकणकवली-मौदे एसटी बसमधील घटना; अज्ञात चोरट्याविरोधात कणकवली पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल

कणकवली (प्रतिनिधी)

 

एसटी बसमधून प्रवास करत असलेल्या एका महिलेच्या पर्समधील सुमारे ४ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अनोळखी चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित महिलेने कणकवली पोलिस ठाणे येथे अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सारिका संदीप गोसावी (वय ५२) या लोरे नंबर २ येथील गोसावीवाडीच्या मूळ रहिवासी असून सध्या दौंड, पुणे येथे वास्तव्यास आहेत. दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ११.४५ वाजण्याच्या सुमारास त्या लोरे नंबर २ येथे जाण्यासाठी फोंडाघाट बसस्थानकात आल्या होत्या. कणकवली-मौदे या एसटी बसमधून प्रवास करत असताना तिकीटासाठी पैसे देण्यासाठी त्यांनी पर्स उघडली असता पर्समधील ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

सुमारे ४ लाख २० हजार रुपये किमतीचे दागिने चोरीस गेल्याचे लक्षात येताच त्यांना मोठा धक्का बसला. बसमध्ये तसेच परिसरात त्यांनी शोधाशोध केली; मात्र दागिने कुठेही आढळून आले नाहीत. अचानक झालेल्या या प्रकारामुळे त्या मानसिकदृष्ट्या हादरल्या असून धक्क्यामुळे त्यांची प्रकृतीही बिघडली. नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी पुणे येथे नेले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर शुक्रवारी त्यांनी अधिकृत तक्रार दाखल केली.

या घटनेमुळे एसटी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार सुभाष शिवगण करीत आहेत.