विज्ञानाचे जनक व्हा तरुण पिढीला दिला माजी आमदार प्रमोद जठार यांनी प्रेरणादायी संदेश

12

 

देवगड (प्रतिनिधी)

विज्ञानाचे जनक व्हा तरुण पिढीला दिला माजी आमदार प्रमोद जठार यांनी प्रेरणादायी संदेश

विजयदुर्ग किल्ल्या येथे ‘विश्व हेलियम दिन’ उत्साहात; विज्ञानप्रेमींचा जयघोष
“जय जवान, जय किसान, जय विज्ञान”च्या घोषात विजयदुर्ग किल्ला दुमदुमला आणि “तरुण पिढीने विज्ञानाचे जनक व्हा” असा प्रेरणादायी संदेश सुनीता शांताराम ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिला. विजयदुर्ग किल्ल्यातील साहेबांचे ओटे येथील माहिती फलकाला पुष्पहार अर्पण करून तसेच हेलियम वायूचे फुगे आकाशात सोडून विश्व हेलियम दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

 

या वेळी नेहरू विज्ञान केंद्र, मुंबईचे सुहास नाईक साटम, विज्ञानप्रेमी डॉ. सुनील आठवले, पवन परुळेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. शासनाच्या वतीने विजयदुर्ग ग्रामपंचायत आणि सुनीता शांताराम ट्रस्ट, कासार्डे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे पार पडला.

 

कार्यक्रमात बोलताना सुहास नाईक म्हणाले, “प्रमोद जठार यांच्या प्रयत्नातून सिंधुदुर्गात विज्ञानाची जागर वाढत असून जिल्ह्यात सुसज्ज विज्ञान केंद्र व्हावे हीच अपेक्षा आहे.” त्याचप्रमाणे डॉ. सुनील आठवले यांनी हेलियमचे महत्त्व स्पष्ट केले. तर विजयदुर्ग हायस्कूलचे शिक्षक परचुडे यांनी हेलियमचा शोध, त्याचे महत्त्व आणि उपयोग याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून ज्ञानात भर घातली.

 

कार्यक्रमाची सुरुवात विजयदुर्ग डेपो येथील गणेश मंदिरात श्रीफळ फोडून झाली. ढोल-ताशांच्या गजरात, हेलियम वायूचे फुगे घेऊन भव्य रॅली काढण्यात आली. भवानीमातेच्या मंदिरातून सुरुवात करून रॅली साहेबाचे ओटे येथे पोहोचली आणि पुढील कार्यक्रम पार पडला.

 

या सोहळ्याला विजयदुर्ग सरपंच रियाज काझी, माजी पंचायत समिती उपसभापती रवी तिर्लोटकर, माजी पंचायत समिती सदस्या शुभा कदम, पडेल मंडल भाजपा महिला अध्यक्ष सुप्रिया आळवे, भाजपा सचिव प्रदीप साखरकर, इतिहासप्रेमी राजेंद्र परुळेकर, ग्रामपंचायत सदस्य दिनेश जावकर, ग्रेसीस फर्नांडिस, विनायक चोडणेकर, निलेश मणचेकर, शिडवणे सरपंच रवी शेट्टे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.