मला जगायचं आहे’ असे म्हणत आनंदवाडी स्मशानभूमीने घेतला अखेरचा श्वास….

288

देवगड (प्रतिनिधी) २८ जुलै २०२४

 

मला जगायचं आहे’ असे म्हणत आनंदवाडी स्मशानभूमीने घेतला अखेरचा श्वास….

 

मृत्यूची वाट कठीण असते याचा प्रत्यय देवगड आनंदवाडी स्मशानभूमीत नागरिकांना

जीवनाच्या रंगमंचावरील शेवटची वाट म्हणजे मृत्यू असे म्हणतात की, मृत्यूची वाट कठीण असते याचा प्रत्यय आज देवगड आनंदवाडी स्मशानभूमीत नागरिकांना येत आहे. आनंदवाडी येथे देवगड खाडीकिनारी वसलेल्या स्मशानभूमीची शेवटची घटका मोजत अखेरचा श्वास घेतल्याचे चित्र आनंदवाडी येथील ग्रामस्थ पहात आहेत.

या स्मशानभूमीची दुरावस्था झाल्याने तेथील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. लवकरात लवकर या स्मशानभूमीवर शेडची तसेच परिसरातील डागडुजी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. स्मशानभूमीच्या आजूबाजूची झाडी झुडपे वाढल्याने जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले आहे स्मशानभूमीचे शेड पूर्णता कोसळून त्याची बिकट अवस्था झाली आहे.

स्मशानभूमी वरील शेडची दयनीय अवस्था यापूर्वीच झाली होती यावर कुठलेही प्रकारचे पत्रे अथवा छप्पर  नव्हते .मात्र सांगाडा शिल्लक होता तो देखील कोसळल्याने आता अंत्यविधी भर पावसाळ्यात करण्याची वेळ ग्रामस्थांवर येऊन ठेपली आहे.पाण्यापासून बचाव करण्यासाठी ताडपत्री,छत्रीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यानंतर असती गोळा करण्यास अत्यंत त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात लाकडे ओली राहत आहेत त्यामुळे मृतदेहाची विल्हेवाट योग्य प्रकारे होत नसल्यामुळे ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. संध्याकाळी कुठल्याही प्रकारची दिवाबत्तीची सोय नसल्यामुळे नागरिकांना स्मशानभूमीतील गैरसोयीमुळे त्रास सहन करावा लागत आहे.

मात्र याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाच्या तसेच लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून देखील याकडे ढुंकूनही पाहण्यास वेळ नसल्यामुळे आनंदवाडी स्मशानभूमीने अखेरचा श्वास घेत आपला देह टाकल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.