सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला आता कॉर्पोरेट लुक मिळणार – कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड
२४ कोटीचा निधी मंजूर; बांधकाम मंत्र्यांचा पुढाकार, लवकर होणार कामाला सुरूवात.
कणकवली( तुळशीदास कुडतरकर)दि १३मार्च २०२४
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालय आता कात टाकणार आहे. त्याला आता कॉर्पोरेट लुक मिळणार आहे. येणाऱ्या काळात हे काम होणार आहे. यासाठी राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तब्बल २४ कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यासाठी कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी पाठपुरावा केला होता.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती १९८१ साली झाली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासकीय इमारतीची उभारणी करण्यात आली. त्यानंतर या इमारतीची किरकोळ दुरुस्ती वगळता एवढ्या मोठ्या प्रमाणात दुरुस्तीसाठी निधी प्राप्त झाला नव्हता. मात्र कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यानी इमारतींची अवस्था पाहिल्यानंतर दुरावस्था झालेल्या इमारतींबाबत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कानावर घातले. तातडीने प्रशासकीय इमारती दुरुस्ती बाबत सुचना पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी श्री. सर्वगोड यांना केल्या होत्या. श्री. सर्वगोड यांनी तातडीने प्रस्ताव करत मुंबई येथील मंत्रालयात प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासकीय इमारतीच्या दुरुस्तीबाबत पत्र प्राप्त झाले आहे. सर्व बाथरुम, इमारतीची दुरुस्ती, अन्य कामे लवकरच सुरुवात केली जाणार आहे, असे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी सांगितले.





