डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेचा ” लाभ घेण्याचे आवाहन – गटविकास अधिकारी वृक्षाली यादव 

10

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेचा ” लाभ घेण्याचे आवाहन – गटविकास अधिकारी वृक्षाली यादव 

देवगड (प्रतिनिधी) ११ जुलै २०२४

बदललेल्या परिस्थितीची गरज विचारात घेऊन जमिनीतील ओलावा टिकवुन ठेवण्याच्या दृष्टीकोनातुन सन २०१६-१७ पासुन शासन डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अनुसुचित जाती व नवबौध्द शेतकऱ्यासाठी राबवत आहे. त्या अनुषंगाने या योजनेचा लाभ देवगड तालुक्यातील अनुसुचित जाती व नवबौध्द शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन देवगड तालुका पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी श्रीम. वृक्षाली यादव व सहाय्यक गटविकास अधिकारी श्री मुकेश सजगाणे यांनी केले आहे.
या योजनेमध्ये अनुसुचित जाती व नवबौध्द शेतकऱ्यासाठी नविन विहीरीसाठी २ लाख ५० हजार रुपये, जुनी विहीर दुरुस्तीसाठी ५० हजार रुपये, इनवेल बोअरींगसाठी २० हजार रुपये, पंपसंच २० हजार रुपये, वीजजोडणीसाठी १० हजार रुपये व शेततळे अस्तरीकरणसाठी १ लाख रुपये, तुषार व ठिबक सिंचनासाठी अनुक्रमे २५ हजार व ५० हजार रुपये अशी अनुदानाची मर्यादा राहणार आहे.
लाभार्थी पात्रतेच्या अटी पुढीलप्रमाणे : लाभार्थी हा अनुसुचित जाती व नवबौध्द शेतकरी असला पाहीजे. शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहीजे. शेतकऱ्याकडे त्याच्या स्वताच्या नावे किमान ०.४० हेक्टर ते कमाल ६.०० हेक्टर जमीन असली पाहीजे. नविन विहीरीव्यतीरिक्त इतर बाबींचा लाभ घेणेसाठी किमान ०.२० हेक्टर जमीन आवश्यक आहे. सामुहीक शेतजमीन किमान ०.४० हेक्टर धारण करणारे एकत्रित कुटुंब नविन विहीर या घटकाचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल. शेतकऱ्याच्या नावे जमिनधारणेचा ७/१२ दाखला व ८अ उतारा असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याचे बँक खाते असणे व सदर खाते आधारकार्डशी संल्गन असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी तहसीलदार यांचेकडुन सन २०२३-२४ चे उत्पन्नाचा दाखला (१,५०,०००/- चे मर्यादेत) सादर करणे आवश्यक आहे.
सदर योजनेचा लाभ ज्या पात्र अनुसुचित जाती व नवबौध्द शेतकऱ्यांना घ्यावयाचा आहे त्यांनी संकेतस्थळावर (https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login ) जाऊन शेतकरी योजना हा पर्याय निवडावा व आधार क्रमांक संकेतस्थळावर प्रमाणित करुन घ्यावा लागेल. अर्ज ऑनलाईन भरताना शेतकऱ्यांनी अद्ययावत सातबारा, ८अ, आधार, जातीचा दाखला,बॅक पासबुक प्रत व आधार लिंक केलेला मोबाईल सोबत ठेवावा.
ऑनलाईन अर्ज भरुन ग्रामसभेच्या शिफारसीने आवश्यक कागदपत्रासह त्याची प्रत गटविकास अधिकारी पंचायत समिती यांचेकडे सादर करावयाचा आहे. अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे शेतकऱ्याने स्वयंसाक्षांकित करणे आवश्यक आहे. त्यानंतर जिल्हा परिषद स्तरावर समितीमार्फत मंजुरी देण्यात येणार आहे. वैयक्तीक लाभार्थी निवडताना महिला व अपंग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार असुन ऑनलाईन लॉटरी पध्दतीने लाभार्थींची निवड करणेत येणार आहे. अुनदानाची रक्कम थेट हस्तांतरण पध्दतीने लाभार्थीच्या आधार जोडणी केलेल्या बँक खात्यावर जमा करणेत येणार आहे.
या योजनेचा लाभ देवगड तालुक्यातील जास्तीत जास्त अनुसुचित जाती व नवबौध्द शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन देवगड तालुका पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी श्रीम. वृक्षाली यादव व सहाय्यक गटविकास अधिकारी श्री मुकेश सजगाणे यांनी केले आहे.