देवगड (प्रतिनिधी)
गावपातळीवर राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे प्रेझेंटेशन प्रभावी पद्धतीने होणे आवश्यक – अरुण चव्हाण
देवगड येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न
मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतींसाठी १०० गुणांची प्रश्नावली तयार करण्यात आली असून यात एकूण आठ प्रश्न आहेत. हे प्रश्न पूर्ण करणे कोणत्याही ग्रामपंचायतीस अवघड नाही.मात्र, गावपातळीवर राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे प्रेझेंटेशन प्रभावी पद्धतीने होणे आवश्यक आहे. प्रत्येक गावाने ग्रामसभा यशस्वी करून ग्रामस्थांचा सहभाग वाढविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन शुक्रवार दि. १२ सप्टेंबर रोजी देवगड सातपायरी येथील इंद्रप्रस्थ हॉल येथे करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे, उपअभियंता बांधकाम श्री. नरेंद्र महाले,उपअभियंता (ग्रा.पा.) श्री. विनायक घेवडे, शाखा अभियंता बांधकाम श्री.अनिल तांबे, विस्तार अधिकारी शिक्षण श्रीरंग काळे, बालविकास प्रकल्प अधिकारी सौ. बाबली होडावडेकर, विस्तार अधिकारी (ग्रा.प.) श्री. दिपक तेंडुलकर, कक्ष अधिकारी श्री. संतोष बिर्जे आदी होते.
या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी अरुण चव्हाण म्हणाले की, या अभियानाचा कालावधी १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ असा असून, या दरम्यान ग्रामपंचायतींनी प्रश्नावलीतील सर्व मुद्द्यांवर काम करणे अपेक्षित आहे. या कालावधीत ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री कधीही भेट देऊन पाहणी करतील. त्यामुळे ग्रामपंचायतींनी सज्ज राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी किंजवडे व बापर्डे या ग्रामपंचायतींचे काम राज्यभर आदर्श ठरत असल्याचा उल्लेख करण्यात आला. या ग्रामपंचायतींनी केलेल्या उपक्रमांची व्हिडिओ क्लिप सर्वत्र दाखवली जाते. विदर्भ- मराठवाड्यातून आलेल्या लोकांनी ही या कामाची पाहणी केली आहे. त्यामुळे इतर ग्रामपंचायतींनीही या दोन मॉडेल ग्रामपंचायतींचा आदर्श घेऊन अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी केले.
दरम्यान यावेळी किंजवडे व बापर्डे सरपंच यांनी आपले मनोगत व्यक्त केले.आपल्या मनोगतावेळी बापर्डे गाव आज सर्वत्र नावलौकिक आहे यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या गावातील ग्रामस्थ व ग्रामपंचायत सफाई कर्मचारी यांचा एकत्रित सत्कार करण्याची विनंती बापर्डे सरपंच यांनी गटविकास अधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित सरपंचांनी या अभियानात सक्रियपणे सहभागी होण्याची ग्वाही दिली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची जबाबदारी ही सर्वांचीच असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतींनी एकत्रित प्रयत्न करावेत, असा एकमुखी निर्धार या कार्यशाळेत व्यक्त करण्यात आला.
या कार्यशाळेत सर्व सरपंच ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






