पत्रकारांचे काम हे नेहमीच समाजभिमुख व समाज उपयोगी – पालकमंत्री रविंद्र चव्हाण
देवगड (स्वप्नील लोके)
पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो . आपल्या समाजात चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात त्याचे प्रतिबिंब बातमीमधून दिसत असते. त्यामुळे पत्रकार हा खरा समाज मनाचा आरसा आहे. हे लक्षात घेत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची कर्तुत्व त्यांचे मूल्य पत्रकारांनी आपल्या कामात नेहमीच रुजवली पाहिजेत. पत्रकारांचे काम हे नेहमीच समाजभिमुख व समाज उपयोगी असले पाहिजे. मराठी साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने प्रकाशित होणारा त्यांच्या जीवन जीवनावरील चरित्र ग्रंथ सर्व पत्रकारांना पोहोचणे आवश्यक आहे .जेणेकरून आजच्या पिढीला त्यांच्या कार्यातून मार्गदर्शन मिळेल. शासन पत्रकारांसाठी अनेक योजना राबवत आहेत आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा 11 हजार रुपयाचा सन्मान नीधी देण्यात येतो. मुंबईमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक लावण्यात येईल. आणि या बैठकीच्या माध्यमातून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. असे प्रतिपादन बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. पत्रकार दिनानिमित्त पोंभुर्ले येथील दर्पण सभागृहात ते बोलत होते.
देवगड तालुक्यातील पोभुर्ले येथील बाळशास्त्री जांभेकर दर्पण सभागृहात महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी समितीचे राज्यस्तरीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित राज्यातील ज्येष्ठ व गुणवंत पत्रकारांना दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मरणार्थ राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार वितरण समारंभ पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी समितीचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ, सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. जगदीश कदम, अलका बेडकिहाळ,पोभूर्ले सरपंच प्रियंका धावडे, उपसरपंच सादिक डोंगरकर, सुधाकर जांभेकर, मधुकर जांभेकर, बापूसाहेब जाधव, विजय मांडके, कृष्णा शिवडीकर देऊळवाडी ग्रामस्थ व जांभेकर कुटुंब उपस्थित होते.
2023 चे दर्पण पुरस्कार प्राप्त पत्रकार जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ पत्रकार माधव कदम सिंधुदुर्ग, राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार प्रशांत कदम नवी दिल्ली, सागर देशपांडे पुणे, कैलास म्हापदी ठाणे, श्रीकांत कात्रे सातारा, महिला पत्रकार पुरस्कार कृतिका पालव मुंबई , साहित्य गौरव पुरस्कार डॉ भगवान अंजनीकर नांदेड, विशेष दर्पण पुरस्कार शशिकांत सोनवलकर दुधेबावी तालुका फलटण, आणि विक्रम चोरमले फलटण यांना प्रदान करण्यात आला.





