देवगड : देवगड तालुका व्यापारी पर्यटन समिती, श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर ग्रामपंचायत, कुणकेश्वर कातवण रापण संघ यांच्या संयुक्त विदयमाने शनिवार ४ नोव्हेंबर व रविवार ५ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत सायंकाळी ३ ते रात्री १० वा कुणकेश्वर बीच या ठिकाणी रापण महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेच्या पदाधिकारी यांनी देवगड येथील व्यापारी संघाच्या कार्यालयात शुक्रवारी संध्याकाळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर,प्रमोद नलावडे,देवगड तालुका व्यापारी संघ अध्यक्ष शैलेश कदम कुणकेश्वर माजी सरपंच गोविंद घाडी, माजी नगरसेवक संजय तारकर , एकनाथ तेली,अजित टाककर,किरण पांचाळ, दिग्विजय कोळंबकर, मिलिंद कुबल , अतुल आंबेरकर आदी उपस्थित होते.
देवगडची अर्थक्रांती ही ताजी मासळी व देवगड हापूसवर अवलंबून आहे.जसे देवगड हापूसचे अनेक प्रकार त्याप्रमाणेच मासेमारीमध्ये अनेक प्रकार मोडतात.यात रापण हा एक पारंपारिक आणि सामूहिक एकतेचे दर्शन घडविणारा मच्छीमारीचा एक मुख्य प्रकार आहे. या
प्रकारची मासेमारी फार थोड्या काळासाठी चालते. त्यामुळे या प्रकारच्या मच्छीमारी मुळे समुद्रातील जैवविविधतेवर फारसा परिणाम होत नाही व निसर्गालाही फारशी हानी पोहोचत नाही. पूर्वीचे लोक या प्रकारच्या पारंपारिक मासेमारीलाच प्राधान्य द्यायचे. परंतु बदलत्या युगात मनुष्यबळाची कमतरता तसेच कमी उत्पन्न
असल्यामुळे या प्रकारच्या मासेमारीचे प्रमाण हळूहळू कमी होत चालले आहे. याच पारंपारिक मासेमारी प्रकाराला
जगभर ओळख मिळावी यासाठी देवगड व्यापारी पर्यटन समिती तर्फे रापण महोत्सव आयोजित करत आहोत. या
महोत्सवात रापण कशी लावतात ? नंतर ती कशी ओढतात ? मासे कसे जमा केले जातात ? याचे प्रात्यक्षिक दाखवले
जाईल. त्या रापणीत मिळालेल्या ताज्या माश्यांचा लिलाव व विक्री याचा पर्यटकांना अनुभव घेता येणार आहे.तसेच पर्यटकांना या ताज्या मासळीच्या रुचकर आणि गरमागरम रेसिपींचा येथेच्छ आस्वाद घेता येणार आहे.मनोरंजनाचा भाग म्हणून जिल्हास्तरीय ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा कराओके सिंगींग यांचाही आस्वाद आपण घेणार आहोत.हा असा आगळावेगळा रापण महोत्सव दि. ४ व ५ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी कुणकेश्वर समुद्रकिनारी
आयोजित करण्यात आलेला आहे.
मागील काही महोत्सवांना पर्यटकांच्या व स्थानिक खवय्यांच्या लाभलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाप्रमाणे या रापण महोत्सवालाही जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा पुरेपूर आस्वाद घ्यावा. देवगड तालुक्यात व्यवसाय व पर्यटनवृध्दी व्हावी या उद्देशाने असे महोत्सव आम्ही आयोजित करत असल्याची माहिती यावेळी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर यांनी दिली. तरी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.





