चांगुलपणाला मरण नाही तोपर्यंत गांधींना मरण नाही : चंद्रकांत वानखेडे

मालवण : मालवण बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे महात्मा गांधींच्या ७५ व्या पुण्यतिथीनिमित्त तसेच प्रा. मधू दंडवते यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘गांधी जागर’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. आज या कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी शुभारंभाच्या भाषणात ज्येष्ठ पत्रकार आणि गांधी विचारांचे अभ्यासक चंद्रकांत वानखडे यांनी गांधी का मरत नाही यावर विचार मांडले.

गांधींचं मोठेपण जगाने स्वीकारले आहे. जगातील सर्वच नेत्यांनी गांधी विचारांना आपलंस केलं आहे. मात्र, गांधींना बदनाम करण्यासाठी काहींनी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केला आहे. आणि त्यात ते यशस्वी ठरले आहेत. गांधीबद्दल खूप अफवा पसरवल्या गेल्या आहेत. मात्र, त्यावर विश्वास न ठेवता गांधी अभ्यासले पाहिजे असं वानखेडे म्हणाले. जोपर्यंत गांधीच्या मुखात राम होता तोपर्यंत देशात दंगे झाले नाही मात्र, गांधीच्या मुखातून राम गेला आणि देशात दंगे झाले असे सांगतानाच, चांगुलपणाला मरण नाही तोपर्यंत गांधींना मरण नाही असं भाष्य वानखेडेनी केलं.

गांधींसोबत आंबेडकर, भगतसिंग, सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस यांबाबतसुद्धा जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले गेले आहेत. त्यावर सुद्धा अभ्यास करण्याची गरज असल्याचे वानखेडे यांनी सांगितलं.