मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर एका आठवड्यातच मेट्रो २ अ आणि ७ नं वर १० लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. मेट्रो २ अ आणि ७ या दोन्ही मेट्रो मार्गिका पूर्णपणे कार्यान्वित झाल्या असून मेट्रो मार्ग १ सोबत जोडल्या गेल्या आहेत, ज्यामुळे मुंबई महानगर प्रदेशात पहिलं मेट्रो नेटवर्क तयार झालं आहे. या दोन्ही मेट्रो मार्गिका, मेट्रो १ च्या माध्यमातून रेल्वे मार्गाशी सहज जोडले गेल्यानं लाखो मुंबईकरांना त्याचा लाभ झाला आहे. २ एप्रिल २०२२ ला पहिला टप्पा कार्यान्वित झाल्यापासून मेट्रो २ अ आणि ७ नं आतापर्यंत जवळपास १ कोटींहून अधिक मुंबईकरांना अखंड सेवा देण्यात यश मिळवलं आहे. आजपर्यंत जवळपास १,००,०३,२७० इतक्या प्रवाशांनी प्रवास केला. मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वर एकूण २२ ट्रेन दररोज २४५ मेट्रो सेवा पुरवत आहेत.
आजपर्यंत एकूण २० हजारपेक्षा अधिक जणांना मुंबई १ कार्ड जारी करण्यात आलं आहे. मुंबई १ कार्ड हे तुम्हाला प्रवासादरम्यान आवश्यक असलेल्या सर्व गरजांसाठी एक सामान्य मोबिलिटी कार्ड आहे. मुंबई – १ कार्ड प्रवाशांना अखंडपणे प्रवास करण्यास मदत करत असल्यानं हे कार्ड प्रवाशांसाठी अधिक सोयीचं होत आहे. हे कार्ड भारतातील सर्व महानगरांमध्ये आणि मुंबईतील सर्व सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी वापरलं जाऊ शकते. या कार्डचा वापर करून शॉपिंग सोबत तसेच मेट्रो, बेस्ट बसची तिकिटे इत्यादी खरेदी करू शकतात. मेट्रोच्या तिकीट खिडक्यांवर हे कार्ड उपलब्ध आहेत. मुंबई – १ कार्ड प्रत्येक सहलीवर ५-१०% सूट देत असून सोमवार ते शनिवार – ५%, रविवार -१०% आणि राष्ट्रीय सुट्ट्या – १०% सवलत देण्यात येते. मुंबई १ कार्डप्रमाणेच ७५ हजार ७३९ वापरकर्त्यांनी (६१७४२ Android आणि १३९९७ IOS) मुंबई-१ मोबाइल ऍप्लिकेशन त्यांच्या डिव्हाइसवर डाउनलोड केलं. या ऍप्लिकेशनद्वारे प्रवासी त्यांच्या ठराविक अंतराच्या तिकिटांसाठी QR कोड तयार करू शकतात.

‘ मुंबई १ कार्ड आणि ॲप हे मुंबईकरांच्या अखंड प्रवासासाठी एक प्रगत पाऊल आहे. आता मेट्रो हे केवळ वाहतुकीचं साधन राहिलं नसून ती एक नवी जीवनवाहिनी बनत आहे. पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण सोहळ्यानंतर आठवडाभरात १ दशलक्षाहून अधिक मुंबईकरांनी मेट्रोनं प्रवास केला. तसंच मेट्रो कार्यान्वित झाल्यापासून आतापर्यंत १ कोटी प्रवासी टप्पा ओलांडण्यात आला आहे. लोक आता त्यांच्या वाहतुकीसाठी खाजगी वाहनांकडून पर्यावरणपूरक मेट्रोकडे वळत आहेत. ‘ असं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एस. व्ही.आर. श्रीनिवास यांनी सांगितलं.





