सिंधुदुर्ग : कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून आठ उमेदवार रिंगणात आहेत. दि 30 जानेवारीला मतदान होत आहे. या बाबत कानोसा घेता मतदार संघातील शिक्षक हे शिक्षक चळवळीला प्राधान्य देण्याच्या भूमिकेत असल्याचे स्पष्ट जाणवत आहे.
खर तर शिक्षक मतदार संघ हे शिक्षकांच्या विविध प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी आहेत. मात्र यावेळी पहिल्यांदाच सर्वच राजकीय पक्षांनी आक्रमण करत व जोर लावत आपलाच उमेदवार निवडून येण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे शिक्षक चळवळीत काम करणारे सर्वच संघटनातील कार्यकर्ते प्रचंड नाराज असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र राजकीय दबावापोटी हे कार्यकर्ते सध्या मौन बाळगून आहेत. मात्र शिक्षकांमधील हालचाली व भूमिका ध्यानी घेता यावेळी शिक्षकामध्ये चळवळीतला उमेदवारच निवडून देण्याबाबत शिक्षकांमध्ये एकमत तयार होत आहे. आज शिक्षक चळवळीमध्ये दीर्घकाळ काम केलेले एकमेव उमेदवार निवडणुकीत आहेत….धनाजी नानासाहेब पाटील.
गेली 30-32 वर्षे शिक्षक चळवळीमध्ये तनमनधनाने आणि अभ्यासू पद्धतीने हजारो शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देणारा चळवळीतील एक शिक्षक कार्यकर्ता म्हणून त्यांचा वावर अवघ्या कोकणामध्ये आहे हे सर्वच संघटनेतील शिक्षक मान्य करतात.
सर्वच शिक्षकांना जुनी पेन्शन मिळावी म्हणून या निवडणुकीसाठी स्वतःला मिळालेल्या पेन्शनची रक्कम खर्च करणारे धनाजी पाटील हे अवघ्या शिक्षकांच्या दृष्टीने आदरार्थी बनले असून त्यांच्याविषयी शिक्षक मतदारांमध्ये मोठी सहानुभूती दिसून येत आहे.
आज राजकीय पक्षांनी प्रचाराच्या निमित्ताने सुरू केलेल्या हालचाली व प्रचाराचे स्वरूप यामुळे शिक्षक नाराज असल्याचे दिसत आहे. विशेषता एका बाजूला राजकीय पक्षांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येणाऱ्या मोठमोठ्या गाड्यांचा ताफा, कार्यकर्त्यांचा एकूण रुबाब व डामडौल आणि दुसरीकडे शाळांना नियमित वेतन अनुदान कधी मिळणार ? आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा कधी पूर्ण करता येणार ? याच्या काळजीमध्ये असलेल्या शिक्षक मतदार असे विरोधाभासाचे चित्र सध्या दिसत आहे. ही बाब शिक्षकांना प्रचंड जिव्हारी लागली आहे. त्यातच जुनी पेन्शन योजना नाकारणे, शाळेतील शिक्षकांची भरती, आर्थिक लाभाची देयक देण्यामध्ये होत असलेला अक्षम्य विलंब, शाळाना अनुदान जाहीर करूनही प्रत्यक्ष अंमलात न आणणे इत्यादी कारणामुळे शिक्षक प्रचंड संतापलेले दिसून येतात. दुसऱ्या बाजूला मत मिळवण्यासाठी काहीजणांनी शिक्षकी पेशाचे अवमूल्यन सुरू केल्यामुळे आयुष्यभर प्रामाणिकपणे वागणारा शिक्षक मात्र अक्षरशः हैराण झाला आहे.
खरंतर शिक्षक चळवळीतील कार्यकर्ते शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी जरूर आवाज उठवतात. अर्थातच सर्वच समस्यांवर तात्काळ निर्णय मिळतो असेही होत नाही. मात्र शिक्षक संघटनांचे प्रयत्न प्रामाणिक असतात हे शिक्षकही मान्य करतात. आता मात्र शिक्षकांचे न्याय हक्क मिळण्यासाठी शिक्षक चळवळीशिवाय पर्यायच नाही याची जाणीव समस्त शिक्षक वर्गालाही झाली आहे. मात्र ते राजकीय दबावामुळे जाहीरपणे व्यक्त होत नाहीत असेच एकूण चित्र आहे. मात्र शिक्षकांची ही तीव्र नाराजी मतदानातून जोरदारपणे व्यक्त होणार असल्याचे शिक्षकांमध्ये बोलले जात आहे.
शिक्षकांतील काही समुदाय राजकीय पक्षाच्या विचाराला मानत असले तरी त्यांच्यामध्येही शिक्षक चळवळ जिवंत राहिलीच पाहिजे असा मतप्रवाह आढळत आहे. त्यामुळे शिक्षक चळवळीतील कार्यकर्त्याला पसंती देण्याकडेच शिक्षकांचा कल असल्याचे जाणवत आहे.




