दोडामार्ग : कर्नाटक सरकार गोव्याच्या दिशेने येणाऱ्या म्हादई नदीचे पाणी वळविण्याचा प्रकार करत आहे. त्याने फक्त गोवा राज्याला त्रास होणार नसून त्याची सुरूवात महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यामधील विर्डी गावापासून होणार आहे. विर्डी गावातील वाळवंटी नदीचा प्रवाह बंद होणार असून गावावर जलसंकट ओढवणार आहे.
त्यामुळे विर्डी गावाचा आवाज बनण्यासाठी दोडामार्ग तालुक्यासह सिंधुदुर्गवासीयांनी साथ द्या असे भावनिक आवाहन उपसरपंच एकनाथ गवस यांनी केले आहे.शिवाय आमची जन्मभूमी विर्डी असली तरी कर्मभूमी गोवा आहे. गोवा सरकारलाही पाठींबा देण्यासाठी कर्नाटक सरकारच्या नदीचा प्रवाह अडविण्याच्या धोरणाला हाणून पाडण्यासाठी एकमुखी संघर्षाचा निर्धार विर्डीवासीयांनी केला असून गोव्यानंतर सिंधुदुर्गवासीयांच्याही रोषाला कर्नाटक सरकारला सामोरे जावे लागणार आहे.
सध्या कर्नाटक सरकारच्या म्हादई नदीचा प्रवाह बदलण्याच्या निर्णयाविरोधात गोव्यात संघर्षाचे वातावरण सुरू आहे. गोव्यात प्रवेश करणारी ही नदी कर्नाटकातून महाराष्ट्रातील विर्डी येथून प्रवेश करते. त्यामुळे गोव्याला जरी या नदी प्रवाहाचा फटका बसत असला तरी सुरुवात विर्डी गावातून होणार आहे. याबाबत जनजागृतीची पहिली बैठक येथील मंदिरात पार पडली. यावेळी उपसरपंच एकनाथ गवस यांसह कॅप्टन नितीन धोंड, पर्यावरण प्रेमी निर्मल कुलकर्णी, उद्योजक विक्रम जैन, जॅक सुखजा, श्री. सुरज, व्हॅन्सी फर्नांडिस, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष भगवान घाडी,वनश्री फाउंडेशनचे संजय सावंत, अमित सुतार, देवेंद्र शेटकर, ग्रामपंचायत सदस्य निकिता बोकारकर, उर्मिला गवस, दीक्षा बांदेकर, पद्मजा गवस व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





