सिंधुदुर्ग : पटसंख्ये अभावी शिक्षक मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील बऱ्याच शाळा बंद पडण्याची वेळ आली आहे. त्याला शिक्षणाधिकारी आणि उपसंचालकांची मुजोरी जबाबदार आहे. त्यामुळे त्यांचा आता आपल्यालाच बंदोबस्त करावा लागेल, काही लोकांवर कारवाई केल्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा माजी आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिला. दरम्यान कोकण विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी रिंगणात असलेले उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी निवडून आल्यानंतर संस्था आणि शिक्षक या दोनच विषयांकडे लक्ष द्यावेत. त्यांना मिळणारे ५ कोटीचे अनुदान त्यांनी केवळ शिक्षण विभागावरच खर्च केले पाहिजे अशी व्यवस्था करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. श्री. म्हात्रे यांच्या प्रचारानिमित्त सावंतवाडी येथे आयोजित विविध शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या स्नेह मेळाव्यात श्री.तेली बोलत होते.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, राष्ट्रीय मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष चिंतामणी तोरस्कर, सिंधुदुर्ग मुख्याध्यापक संघाचे सचिव गुरुदास कुसगावकर, राजेंद्र माणगावकर, सिंधुदुर्ग मुख्याध्यापक संघ उपाध्यक्ष रामचंद्र घावरे, बबन उर्फ नारायण राणे, सुजित कोरगावकर, प्रसन्ना देसाई, प्रतीक बांदेकर आदींसह मोठ्या संख्येने भाजप व बाळासाहेबांची शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील विविध शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तेली पुढे म्हणाले, जिल्ह्यातील बऱ्याच शाळांना पटसंख्या अभावी शिक्षक मिळत नाहीत. त्यामुळे अशा शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या घटत असतानाच शिक्षकां अभावी सुद्धा विद्यार्थी त्या शाळांमध्ये शिक्षण घेणे टाळत आहेत. याला सर्वस्वी शिक्षणाधिकारी व उपसंचालकांची मुजोरी जबाबदार आहे. त्यांचा वेळीच बंदोबस्त करावा लागेल. काहींवर कारवाई केल्याशिवाय संबंधित अधिकारी योग्य मार्गावर येणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला. तर ग्रामीण भागातील शाळा चालवताना शिक्षकांची दमशाग होत आहे. त्यांच्यावर सुद्धा येत्या काळात गांभीर्याने लक्ष दिले जावेत, अशी मागणी त्यांनी केसरकर यांच्याकडे कार्यक्रमात बोलताना केली.





