मालवण : अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने मालवण तालुक्यात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील वायंगणी माळरानावर शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अर्धवट जळलेला मृतदेह आढळला आहे. संबंधित मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत असल्यामुळे त्याची ओळख पटवणे मुश्किल बनले आहे. दरम्यान, मृतदेहापासून काही अंतरावर एक आधारकार्ड चे कव्हर मिळून आले आहे. त्यावरून मृताची ओळख पटवण्याचे काम पोलीस करीत आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे घटनास्थळी दाखल झाले आहेत. याठिकाणी घातपाताचा संशयही व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना निदर्शनास आल्यानंतर घटनेची माहिती मिळताच आचरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याठिकाणी तपास सुरु असून उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे घटनास्थळी ठाण मांडून आहेत. तर अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक भोसले यांनी देखील घटनास्थळी भेट दिली.
दरम्यान पोलीस तपासात या घटनेबाबत आणखीन काही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली आहे. पुणे येथील एक युवक बेपत्ता असल्याची तक्रार पुणे पोलिसांत देण्यात आली होती. सदरच्या युवकाचे मूळ घर मालवण शहरात असल्याने त्याचे नेहमी मालवणात येणे-जाणे होते. सदरचा युवक नेहमी वायंगणी माळरानावरूनच तोंडवळी येथील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास जात असे.
तो १३ जोनवारीपर्यंत त्याच हॉटेलवर वास्तव्यास असल्याचीही माहिती युवकाच्या मालवणातील नातेवाईकांना मिळाली आहे. संबंधित युवकाने मालवण येथून एक दुचाकी भाड्याने घेतली होती. ती त्याने परत केली होती. सदर युवक बेपत्ता असल्याचा मेसेज समाज माध्यमांवर झळकला होता. वायंगणी माळरानावर एक मृतदेह सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.
मात्र, मृतदेह ओळखण्यापलीकडे असल्याने त्यांनी पुणे येथील त्याच्या कुटुंबियांना माहिती दिली. पुणे येथून त्या युवकाची पत्नी मालवणकडे येण्यास रवाना झाली असून ती आज दाखल होणार आहे. मृतदेहाच्या हाताच्या बोटांमध्ये सापडून आलेल्या अंगठीवरून त्याची ओळख पटविण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच त्याचे आई-वडील नसल्याने डीएनए करायचे झाल्यास त्याच्या इतर कुटुंबियांचे नमुने घेण्यात येणार असल्याचीही माहिती पुढे आली आहे.





