मळेवाड : सातार्डा गावातील लोकवस्तीच्या ठिकाणी बिबट्याचा मुक्तसंचार सुरू आहे.जाधववाडीमध्ये सोमवारी रात्री साडेतीन वाजताच्या दरम्यान ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे बिबट्याच्या हल्यातून ग्रामपंचायत सदस्य मिलिंद जाधव यांच्या मालकीचा कुत्रा बचावला.बिबट्याची चाहूल लागल्याने जाधववाडीतील ग्रामस्थांनी सोमवारी रात्री साडेतीन वाजताच्या दरम्यान घरा बाहेरचा विद्युत पुरवठा सुरु केला होता. त्याचवेळी बिबट्याने पाळीव कुत्र्यावर झडप घातली होती. बिबटयाच्या हल्यात कुत्रा जख्मी झाला. त्यानंतर बिबट्या जंगलाच्या दिशेने पळून गेला. गेल्या दोन महिन्यांपासून परिसरामध्ये बिबट्याचा उपद्रव वाढला आहे. बिबटयाकडून कुत्रे फस्त केले जात आहेत. रात्री, अपरात्री, पहाटेच्यावेळी फिरणाऱ्या दुचाकीस्वार, पादचारी यांना बिबट्याचे दर्शन होत आहे. बिबटयाच्या मुक्तसंचारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.





