विवाहितेच्या वडिलांची उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी.!
कणकवली : देवगड तालुक्यातील किंजवडे गावातील विवाहित महिलेचा एप्रिल महिन्यात झालेल्या मृत्यू मागे घातपात झाला आहे, असा संशय विवाहितेच्या वडिलांनी व कुटुंबीयांनी व्यक्त करून पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे यांची भेट घेत निवेदन दिले आहे. प्रेमविवाह झाल्यानंतर सासरच्या लोकांचा तिला विरोध होता. त्या रागातून तिची हत्या करण्यात आली व तिचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचे भासविण्यासाठी तिच्या माहेरी न कळवता घाईघाईने तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. असा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
गंगाराम कदम यांनी आपल्या निवेदनात असे म्हटले आहे, की संजना सागर परब ( लग्न अगोदरच नाव मालीनी गंगाराम कदम, राहणार किंजवडे भरडवाडी) हिचा पाच वर्षांपूर्वी सागर परब राहणार चिंचवडे भरडवाडी यांच्याशी प्रेम विवाह झाला होता. या लग्नात सागर परब यांच्या आई – वडिलांची परवानगी नव्हती. लग्नानंतर संजना हिला सासरे विलास परब, सासू लक्ष्मी परब, नवरा सागर परब, ननंद कोमल पुजारे, अजय पुजारे यांच्याकडून शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता. याबाबत सासरी होणाऱ्या जाचाबाबत तिचा पती सागर परब सर्व कुटुंबीयांच्या भीतीने तिने माहेरी याबाबत कोणत्याही प्रकारची कल्पना दिली नव्हती.
बुधवारी १२ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९:३० वा. संजना परब यांची हत्या करण्यात आली. याबाबत कींजवडे गावचे सरपंच यांनी अर्जदारांचे शेजारी प्रकाश परब यांना संजना हिला रुग्णालयात उपचार करिता दाखल केले असल्याचे संजना याच्या आई – वडिलांना कळविण्यास सांगितले. सदरबाबत माहिती मिळाल्यानंतर संजना परब हिला रुग्णालयात पाहण्यासाठी मी स्वतः व माझ्यासोबत माझी पत्नी गीता गंगाराम कदम व शेजारी गेलो असे या अर्जात म्हटले आहे.
यावेळी आम्हास कोणतीही कल्पना व पूर्वसूचना न देता संजना हिला थेट पोस्टमार्टम करण्यासाठी नेण्यात आले व त्यानंतर संजना हिचा मृतदेह तिचे भाऊ येईपर्यंत दहन न करण्याचे सांगून सुद्धा किंजवडे गावचे सरपंच, पोलीस पाटील व तिच्या सासरच्या कुटुंबीयांनी जबरदस्तीने मृतदेहाचे दहन केले, असा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
याप्रकरणी तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अशी मागणी गंगाराम कदम यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्याकडे केली आहे. दरम्यान आता पोलीस नक्की काय भूमिका घेतात आणि तपासाची दिशा कशा पद्धतीने वळवतात याकडे एक न्यायिक भाग म्हणून सर्वांचे लक्ष लागले आहे.





