एसटी बस मध्ये चढताना चोरट्याने पर्स मधील बारा लाखांचे सोन्याचे दागिने लांबविले.!

108

कणकवली : बस मध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने विवाहितेच्या पर्समधील १२ लाख रुपये किमतीचे २१ तोळ्याचे दागिने लंपास केले. दागिने चोरीची घटना सोमवारी दुपारी १२ वाजून ३० मिनिटाच्या सुमारास कणकवली – लातूर एसटी बस प्लॅटफॉर्मवरअसताना घडली.

याबाबत सुचिता सूर्यकांत कदम (५८ राहणार सांताक्रुज- मूळ राहणार कुर्ली. ता – वैभववाडी ) यांनी कणकवली पोलिसात फिर्याड दाखल केली आहे. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये ८ तोळ्याचे पेंडल मंगळसूत्र, ३ तोळ्याची रुद्राक्ष सोन्याची माळ , प्रत्येकी एक तोळ्याच्या काळा, पिवळा व लाल रंगाच्या पावळण्याच्या सोन्याच्या अंगठ्या, ३ तोळ्याच्या बांगड्या, याचा समावेश होता.

सविस्तर वृत्त असे की, सुचिता कदम त्यांच्या पतीसह मुंबईहून जनशताब्दी एक्सप्रेसने दुपारी कणकवली रेल्वे स्टेशनवर आल्या. तेव्हा त्यानी हॅन्ड बॅग मधील छोट्या पर्स मधील सोन्याच्या दागिन्यांची खात्री केली. तिथून गावी कुर्ली येथे जाण्यासाठी त्या पतीसह कणकवली एसटी बस स्थानकावर आल्या. गावी जाण्यासाठी त्या कणकवली – लातूर बस मध्ये चढल्या. गर्दीचा फायदा उठवत चोरट्याने त्यांच्या हँडबॅग मधील दागिने ठेवलेली पर्स लांबविली. बस मध्ये चढल्यावर सुचिता कदम यांच्या बॅगेची चेन उघडी असल्याचे निदर्शनात आले. म्हणून त्यांनी खात्री केली असता दागिने ठेवलेली पर्स गायब असल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांनी बसमधून उतरून पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे अधिक तपास करत आहेत.