सावंतवाडी : निगुडे सीमेवर असलेल्या इन्सुली, वेत्ये, सोनुर्ली आदी भागात सुरू असलेल्या क्वारी ( काळ्या दगडाच्या खाणी) भूसुरंग लावले जात असल्यामुळे गेल्या चार ते पाच वर्षात पाचशेहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित घरमालकांना भरपाई मिळावी, तसेच अन्य मागण्यांसाठी निगुडे सरंपच लक्ष्मण निगुडकर यांनी १४ तारखेला सोनुर्ली-निगुडे तिठा येथे सकाळी १० वाजता उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
तसेच अवजड वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता दिलेला असताना या ठिकाणी शेर्ले, निगुडे, सातार्डा हा रस्ता वाहतुकीसाठी वापरला जात आहे. त्यामुळे ही वाहतूक रोखण्यात यावी, तसेच २४ तास सुरू असलेले काम वेळ ठरवून करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत त्यांनी प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. या ठिकाणी व्यावसाय करणाऱ्या क्वारी मालकांकडुन चुकीच्या पध्दतीने सुरुंग स्फोट केले जात आहे. त्यामुळे परिसरातील घरांचे नुकसान होत आहे. २०१८ पासून अद्याप पर्यंत संबंधित घरांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा करून सुध्दा अद्याप पर्यंत कोणतीही सकारात्मक भूमिका घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आपण शासनाच्या विरोधात आंदोलन करीत आहे, असे निगुडकर यांनी दिलेल्या पत्रात नमुद केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून उपोषण सुरु करण्याचा इशारा निगुडकर यांनी दिलाय.





