काजूच्या हमीभावासाठी अर्चना घारेंनी घेतली अजितदादांची भेट…!

सावंतवाडी : काजूला हमी भाव मिळण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून सकारात्मक धोरण ठरविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी व्यक्त केला. काजू बी ला राज्य शासनाकडून १५० रुपयांचा हमीभाव देण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या महिला कोकण विभागीय अध्यक्षा सौ. अर्चना घारे यांनी आज पवार यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी बागायतदारांच्या व्यथा मांडल्या.

त्या म्हणाल्या, गेल्या वर्षीच्या तुलनेत काजू बी चे दर सुमारे २५-३०% कमी झाले आहेत. एकीकडे काजू गराचे दर वाढत असताना काजू बी चे दर कमी होत आहेत. गेल्या वर्षी मिळालेला १३५ ते १४० रुपयांचा दर यावर्षी १००-१०५ रुपयांवर आला आहे. सध्या काजूगराचा दर १२०० ते १५०० रुपये किलो आहे. मात्र, काजू-बी ला नाममात्र १०० ते १०५ रुपये किलो असा व्यापारी भाव दिला जात आहे. काजू उत्पादनातील ही तफावत शेतकऱ्यांच्या मेहनतीवर घाला घालणारी आहे. काजू-बी खरेदीचे व्यापाऱ्यांचे धोरण हे शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे.

वातावरणातील बदल, मजुरीचे वाढलेले दर खतांचे वाढलेले दर, कीड रोग व्यवस्थापन, वन्य प्राण्यांसह आग व चोरांपासून होणारे नुकसान या सगळ्यांशी झुंजत काजू उत्पादन घेणे अवघड झाले आहे. सध्या बाजारातील काजू- बी दर अत्यंत कमी असून व्यापारी मनमानीपणे दर लावत असून याला चाप लावण्यासाठी सरकारने १६० रुपयांचा हमीभाव जाहीर करावा , तसेच काजू बी खरेदी केंद्र सुरू करावीत, ज्यामुळे या परिसरातील शेतकरी बांधवांना दिलासा मिळेल, अशी मागणी त्यांनी यावेळी श्री. पवार यांच्याकडे केली.