Ratnagiri | दोन मित्रांनी एकमेकांवर केले जीवघेणे वार | रत्नागिरी खेडशी येथील घटना

126

रत्नागिरी : शहरानजिकच्या खेडशी येथे घरगुती वादातून मित्रानेच मित्रावर धारदार सुरीने वार करुन जीवघेणा हल्ला केला. आपला बचाव करताना त्या तरुणाने आपल्याकडील चाकूने हल्ला करणार्‍या तरुणावर देखील चाकूने वार केला आहे. ही घटना मंगळवारी रात्री ८.४५ वा.च्या सुमारास घडली.

रेहान बाबामियॉं मस्तान हा सराईत गुन्हेगार असून तो गेल्या १ महिन्यापासून त्याचा मित्र विनायक हेडगे याच्याकडे रहायला होता. या दोघांचे घरगुती संबंध होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये अज्ञात कारणावरुन बिनसले होते. त्याचे रूपांतर मंगळवारी जीवघेणा हल्ल्यात झाले.

घटना अशी की, मंगळवारी रात्री विनायक घरी आल्यानंतर त्याने आपला मित्र रेहान याच्यावर चाकूने हल्ला केला. एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल सात वार रेहान याच्यावर केले. विनायक वार करत असतानाच बचाव करताना रेहान याने आपल्याकडील चाकूने विनायक याच्या हातावर वार केला. मात्र विनायक हा बेभान झाला होता. त्याने आपला हल्ला सुरुच ठेवला. या हल्ल्यात रेहान गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. रेहानला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रेहान गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचाराकरिता कोल्हापूर येथे हलविण्याची कार्यवाही सुरू होती.

दरम्यान विनायक याने हा हल्ला नेमका कोणत्या कारणावरुन केला याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. कौटुंबिक वादातूनच हा हल्ला झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.