अतिक्रमणावरील कारवाई फार्स ठरेल की वास्तव ?……..

95

कणकवली : होणार होणार अशी चर्चा असलेली महामार्ग प्राधिकरणाची कणकवली येथील उड्डाणपुलाखालील अतिक्रमित बांधकामे हटवण्याचे कारवाई अखेर सुरू झाली . या ठिकाणी उभारण्यात आलेले स्टॉल्स काही हटवले गेले तर काहींनी स्वतःहून काढून टाकले वास्तविक नगरपंचायतीची भाजी मंडई होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात भाजीविक्रेते आणि फळ विक्रेते यांची सोय उड्डाणपूलाखाली कणकवली नगर पंचायतीकडून करण्यात आली होती . परंतु याचा गैरफायदा घेत सर्वच प्रकारच्या व्यापाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुला खालील जागा अनधिकृतपणे व्यापत तर काहींनी या ठिकाणी बेकायदेशीररित्या पक्की बांधकामे करून व्यवसाय सुरू केले होते .नगरपंचायत प्रशासनाने सर्व संबंधितांना याबद्दल वेळोवेळी जागृत करूनही हे अतिक्रमित व्यवसाय सुरूच होते . यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले होते तसेच स्टॉल आणि टपरीधारकात जागेवरून हाणामारीचे प्रसंगही उद्भवत होते , अवैध वस्तूंची राजरोस विक्री आणि छेडछाडीचे प्रकारही वारंवार घडत होते, खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या दुचाकी तात्पुरत्या स्वरूपात पार्किंग करणे अडचणीचे ठरत होते , सेवा रस्त्याचा बराचसा भाग पार्किंग खाली जात असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत होता आणि यामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत होत होते. त्याचा परिणाम कणकवलीच्या बाजारपेठेवर होत होता . या सर्वच घटकांच्या तक्रारी आणि गैरसोयीची दखल घेत अखेरीस महामार्ग प्राधिकरणाने यावर कारवाई करण्याचा कठोर निर्णय घेतला आणि आज ती कारवाई सुरू देखील केली .

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या हद्दीत विना परवागनी वाहने उभी करणे, व्यवसाय करणे, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, अतिक्रमण करणे तसेच दुभाजक तोडणे आदीबाबत कारवाई करण्यासंदर्भातील नोटीस महामार्ग प्रधिकरणने शहरात यापूर्वी लावली होती . विशेष म्हणजे महामार्ग प्राधिकरणने यापुर्वीही अर्धवट बांधकामे व अतिक्रमणाबाबत इशारा दिला होता. राष्ट्रीय महामार्ग नियंत्रण अधिनियम २००२ मधील कलम २४, २६ ३१, ३७ व ३९ नुसार राष्ट्रीय महामार्ग हद्दीत विनापरवानगी वाहने उभी करणे, महामार्गाच्या हद्दीत व्यवसाय करणे, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, अतिक्रमण करणे बेकायदेशीर कृत्य आहे आणि सदर कृतीबाबत पुनरावृत्ती झाल्यास सदरची कृती ही दखलपात्र गुन्हा देखील आहे. याबाबत कमीत कमी प्रति चौ. मी. ५०० रु. एवढा दंड आकारला जाऊ शकतो , तसेच अतिक्रमण हटविणेच्या कार्यवाहीचा खर्च देखील संबंधितांकडून वसूल करण्यात येतो. दुभाजक खंडित केल्यास सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येतो .या सर्व कायदेशीर तरतुदी असताना सुदधा कणकवलीतील उड्डाण पुलाखाली बिन दिक्कतपणे बॅरिकेटस सोडत अतिक्रमण करून स्टॉल्स उभारण्यात आले होते .

नागरिकांनी अतिक्रमण हटावबाबत समाधान व्यक्त केले आहे . परंतु ही कारवाई कायम राहील अशी व्यवस्था महामार्ग प्राधिकरणाने करावी अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे . थोडक्यात महामार्गावरील उड्डाणपूल कायमचा मोकळा श्वास घेईल की परत एकदा व्हेंटिलेटर वर जाईल हे येणारा काळच ठरवेल .