हळवल रेल्वे फाटकाचे तांत्रिक बिघाड अपघाताच्या दृष्टीने धोकादायक | प्रशासनाला गांभिर्य नाहीच

158

पंचक्रोशीतील वाहन  चालकांमधून होतोय संताप व्यक्त…! 

कणकवली : कणकवली – हळवल – शिरवळ मार्गावरील रेल्वे फाटकामुळे दशक्रोशीतील वाहतूक दिवसाच्या २४ तासांपैकी केवळ १६ तास पेक्षा जास्त वेळ बंद राहते. त्यामुळे शालेय विद्यार्थी अत्यवस्थ रुग्णांचे हाल होतात. ह्या गंभीर समस्या ओळखून कोकण रेल्वे महामंडळ कडून बांधण्यात आलेले रेल्वे पुलही पंधरा वर्षे झाली परंतु जोड रस्याअभावी या पुलावरून अद्याप वाहतूक सुरू झाली नाही. रेल्वे फटकामुळे दिवसाचे आठ तास सुरू असणारी वाहतूक रेल्वे फाटकाच्या वारंवार बिघाडांमुळे जीवघेण्या अपघातांस आमंत्रण देणारे ठरणार आहे. सोमवारी फटकाच्या यांत्रिक बिघाडामुळे फाटक पडले नाही, म्हणून पर्यायी असलेले फाटक लावण्यात आले. परंतु त्यामध्येही बिघाड होऊन एका बाजूचे फाटक न उघडल्याने कित्येक वाहने रेल्वे फाटकावर अडकून पडली होती. त्या काळात जर दुसरी रेल्वे आली असती तर मोठा अनर्थ घडला असता. यामुळे रेल्वे प्रशासनाने या रेल्वे फटकातील तांत्रिक दोष दूर करून संभाव्य अनर्थ टाळावा, अशी मागणी हळवल – कळसुली दशक्रोशीतून होत आहे.

मार्गावरून हळवल, शिरवळ, शिवडाव, कळसुली, आंब्रड, पोखरण, कुंदे, कसवण, तळवडे, जांभवडे, कुपवडे, घोडगे या गावातून वाहतूक सुरू असते. परंतु हळवल येथील रेल्वे फटकामुळे दिवसाच्या २४ तासांपैकी १६ तासांपेक्षा जास्त काळ या मार्गावर मोठी गैरसोय होते. परंतु उर्वरित वेळेतील वाहतूक रेल्वे फाटकाच्या वारंवार यांत्रिक बिघाडांमुळे धोक्याची ठरत आहे. त्यामुळे मोठा अनर्थ होण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे.

सोमवारी सकाळी ११: १० वा. च्या सुमारास मालगाडी येणार असल्याबाबत सिग्नल मिळाला. परंतु फाटकाच्या यांत्रिक बिघाडामुळे फाटक पडलेच नाही. म्हणून पर्यायी गेट बंद करण्यात आले. परंतु रेल्वे निघून गेल्यावरही एका बाजूचा गेट बरेच दिवस बंद असल्यामुळे तोही उघडला नाही. यामुळे दुसऱ्या बाजूच्या उघडलेल्या गेटने आलेली वाहने रेल्वे ट्रॅकवर अडकून पडली. त्यानंतर धावपळ करून या तांत्रिक यंत्रणांकडून तो गेट उघडण्यात आला. या काळात अन्य रेल्वे ट्रॅक वर आली असती तर..? मोठा अनर्थ ओढावला असता. रेल्वे गेट पडल्यावर मार्गावरील पंधरा मिनिटे वाहतूक बंद असते. परंतु सोमवारी फाटकाच्या बिघाडामुळे सुमारे ४० मिनिटे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वे फाटकाच्या यांत्रीक बिघाडामुळे अनेक वेळा वाहतूकीचा खोळंबा होत असतो.यामुळे रेल्वे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन योग्य ते पर्याय करण्याची मागणी दशक्रोशीतल जनतेकडून होत आहे.