व्वा लाजवाब ! रानभाज्यांतून विद्यार्थ्यांनी पदार्थ बनवले खास ; कनेडी हायस्कूलमध्ये रानभाजी प्रदर्शन व पाककला स्पर्धा
माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत रानभाजी प्रदर्शन व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नैसर्गिक व पारंपारिक अन्न घटकांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी तसेच रानभाज्यांच्या आरोग्यदायी महत्त्व अधोरेखित व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
या कार्यक्रमास कनेडी गट शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष सन्मा.श्री.सतीश सावंत साहेब, शालेय समिती चेअरमन श्री.आर.एच.सावंत, खजिनदार श्री.गणपत सावंत, सदस्य श्री. संतोष सावंत आदी पदाधिकारी व मान्यवर तसेच उप कृषी अधिकारी कणकवली श्री. लक्ष्मण साबळे, प्रशालेतील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, पालक,सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी पालकांच्या सहकार्याने तयार केलेले अळू वडी, अळू मंचुरिय, अळूचे बोंबील, अळूचे फदफद, अळू पराठे, शेवग्याची भाजी, शेवग्याचे पराठे, आळूचे बोंबील, कुर्डूची भाजी व भाकरी, टाकळा इडली, टाकळा भजी, टाकळा सँडविज, टाकळा पराठा, टाकळ्याची चटणी-भाकरी, भारंगी कटलेट, सुरण भजी, पेवग्याची भाजी, पेवग्याचे पराठे अशा विविध चविष्ट व नाविन्यपूर्ण पदार्थांची मेजवानी सादर केली. आधुनिक फास्ट पुढच्या युगातही नैसर्गिक पारंपरिक अन्नाचे महत्त्व अधोरेखीत करत त्यांनी या पाककृती सादर केल्या. संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी विद्यार्थ्यांची कौतुक करताना सांगितले, पिझ्झा बर्गरच्या जमान्यात रानभाज्यांचा वापर करून असे नावीन्यपूर्ण पदार्थ तयार करणे ही निश्चितच प्रशंसनीय गोष्ट आहे.
निसर्ग हा सर्वांचा गुरु आहे, निसर्गाचे देण रानभाजी आहे, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात देखील रानभाज्यांचा समावेश करावा, आपले दीर्घायुष्य वाढवण्यास रानभाज्या उपयुक्त आहेत. अशा रानभाज्यांचे पदार्थ बनवून त्यांचे मार्केटिंग करणे आवश्यक आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रदर्शनामध्ये टाकला, अळू , कुर्डू,फोडशी, भारंगी, सुरण, घोळ, एक पानाची भाजी, कुड्याच्या शेंगा आदी शास्त्रीय माहितीपत्रक व त्यांच्या आयुर्वेदिक गुणधर्माची माहिती देखील सादर करण्यात आली. या सर्व पालकला परीक्षणासाठी इयत्ता पाचवी ते सातवी पहिला गट, इयत्ता आठवी ते दहावी दुसरा गट तसेच इयत्ता अकरावी ते बारावी तिसरा गट तयार करून त्यांचे प्रशालेतील परीक्षकांमार्फत परीक्षण करण्यात आले. त्यामधून प्रत्येक गटातील पहिल्या तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना प्रशालेतील वस्तू भंडारा मार्फत बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. या सर्व प्रदर्शनाचे उत्कृष्ट नियोजन श्री. डी.व्ही.सावंत, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. सुमंत दळवी, सूत्रसंचालन श्री. प्रसाद मसुरकर यांनी केले.