सावंतवाडी (प्रतिनिधी)
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाची मागणी अखेर पूर्ण
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. तब्बल ४० वर्षांच्या अथक संघर्षानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी १ ऑगस्ट रोजी यासंदर्भात अधिसूचना जारी केली असून, येत्या १८ ऑगस्टपासून खंडपीठाचे कामकाज सुरू होणार आहे.
गेली अनेक वर्षे कोल्हापूरमध्ये खंडपीठाची स्थापना व्हावी यासाठी वकील संघटना आणि सामान्य नागरिक सातत्याने आंदोलने, मोर्चे आणि निवेदने देत होते. या मागणीसाठी वकिलांनी अनेकदा न्यायालयीन कामकाजावर बहिष्कारही घातला होता. या दीर्घकाळ चाललेल्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे.
या निर्णयामुळे आता सहा जिल्ह्यांतील नागरिकांना कायदेशीर कामांसाठी मुंबईला जावे लागणार नाही. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी या निर्णयाची माहिती सर्वप्रथम माजी खासदार संभाजीराजे यांना दिल्याचे समोर आले आहे.
याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक यांनी समाधान व्यक्त केले आहे. ही मागणी आपल्या काळात पूर्ण झाल्याचा त्यांना मोठा आनंद असून, या निर्णयाचा फायदा सिंधुदुर्गसह सर्व संबंधित जिल्ह्यांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या ऐतिहासिक निर्णयाचा आनंद साजरा करण्यासाठी लवकरच आनंदोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.
या खंडपीठाच्या स्थापनेमुळे न्यायव्यवस्था सर्वसामान्यांसाठी अधिक सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे.





