देवगड (प्रतिनिधी)
ABSS 2025 अंतर्गत देवगड तालुक्यात विशेष वैद्यकीय निदान शिबिरांचे आयोजन
सीडब्ल्यूएसएन विद्यार्थ्यांसाठी 29 जुलैपासून सुरू होणारी शिबिरे; फिजिओथेरपी, दृष्टीदोष, अस्थिव्यंग तपासणीसह UDID नोंदणी
अखिल भारतीय शिक्षा समागम (ABSS) 2025 या उपक्रमांतर्गत समग्र शिक्षा अभियान, समावेशित शिक्षण आणि राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड तालुक्यात विशेष वैद्यकीय निदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. 29 जुलै 2025 पासून या शिबिरांना सुरुवात होणार आहे.
या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले असून, विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी(CWSN) समावेशक, समान आणि दर्जेदार शिक्षणाच्या उद्देशाने या शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे. इयत्ता 1 ली ते 12 वीपर्यंतचे विद्यार्थी या शिबिराचा लाभ घेऊ शकतात.
शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:
३१ जुलै बाह्य फिजिओथेरपी गट साधन केंद्र, (देवगड ), १ ऑगस्ट दृष्टीदोष तपासणी ग्रामीण रुग्णालय,(देवगड PHC ),२ ऑगस्ट अस्थिव्यंग तपासणी ग्रामीण रुग्णालय,(देवगड ),४ ऑगस्ट UDID नोंदणी शिबिर गट साधन केंद्र,(देवगड) .विशेष विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी शैक्षणिक व वैद्यकीय मदत मिळावी या हेतूने ही तपासणी व नोंदणी शिबिरे उपयुक्त ठरणार आहेत. पालक, शिक्षक व विद्यार्थी यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.





