मसुरे रेल्वे स्थानकावरील विविध समस्या बाबत स्थानिक आक्रमक, अधिकाऱ्यांना धरले धारेवर

7

 

सावंतवाडी (प्रतिनिधी)

मसुरे रेल्वे स्थानकावरील विविध समस्या बाबत स्थानिक आक्रमक, अधिकाऱ्यांना धरले धारेवर

 

मडूरे रेल्वे स्थानकावरील समस्यांबाबत माहिती घेण्यासाठी आलेल्या कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना स्थानिकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. कोकण रेल्वे कार्पोरेशनने मडूरे स्थानकावर केलेल्या अन्यायाचा पाढा वाचण्यात आला. मडूरे स्थानकावरील समस्या व स्थानिकांच्या मागण्या याबाबत गेली २० वर्षे कोरे प्रशासनाबरोबर संघर्ष करत असल्याचे स्थानिकांनी शिष्टमंडळाला सांगितले. आपल्या सर्व मागण्या वरिष्ठ कार्यालयाकडे लेखी स्वरूपात सादर करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी अधिकारी व स्थानिक यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

 

जिल्हाधिकारी डॉ. अनिल पाटील यांच्या निर्देशानुसार मडूरे रेल्वे स्थानकावरील समस्या जाणून घेण्यासाठी कोकण रेल्वे अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ सोमवारी स्थानकावर आले. यात कमर्शियल सुपरवायझर मधुकर मातोंडकर, सेक्शन इंजिनियर जे. पी. प्रकाश, इलेक्ट्रिकल इंजिनियर चिन्मय भंडारी, विभागीय सुपरवायझर व्ही. डी. सामंत यांचा समावेश होता.

 

सुरुवातीपासूनच संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश गावडे, प्रकाश वालावलकर यांनी आक्रमक भूमिका घेतली. कोकणकन्या, मांडवी व तुतारी या गाड्यांना थांबा मिळावा यासाठी गेली वीस वर्षे संघर्ष सुरू आहे. या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने या प्रकल्पासाठी जमिनी दिल्या. मात्र, कोरे कार्पोरेशनने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप सुरेश गावडे यांनी केला. अनेक वर्षांपासून गणपती स्पेशल सह अन्य स्पेशल गाड्यांना मडूरे स्थानकावर थांबा मिळत होता. मग गेल्या दोन वर्षापासून थांबा का दिला जात नाही ? प्रत्येक बाबीसाठी आम्ही संघर्ष करावा का, असा सवाल प्रकाश वालावलकर यांनी उपस्थित केला.

 

कोकण रेल्वेच्या ‘ड’ श्रेणी कर्मचारी भरतीच्या परीक्षेत अन्य राज्यातील, देशातील माहितीचे प्रश्न का असतात ? स्थानिकांना डावलून अन्य राज्यातील बेरोजगारांना पैसे घेऊन भरती करण्याचा कॉर्पोरेशनचा डाव असल्याचा आरोप सुरेश गावडे यांनी केला. यावेळी तुतारी, कोकणकन्या व मांडवी गाड्यांना थांबा देणे, स्टेशनकडे येणाऱ्या रस्त्याची डागडूजी करणे, स्ट्रीट लाईट व्यवस्था करणे, नोकर भरतीच्या अटी व शर्ती शिथील करून रेल्वे प्रकल्पासाठी सामाईक क्षेत्रातील जमीन गेलेल्या प्रत्येक कुटुंबातील सदस्याला नोकरीत सामावून घेणे, कोकण रेल्वेने केलेले अतिक्रमण हटविणे, रो – रो गाड्यांना थांबा देऊन रोजगार पूरक उपक्रम सुरू करणे, प्लॅटफॉर्म वर छताची व्यवस्था करणे अशा अनेक मागण्या सादर करण्यात आल्या.

 

स्थानिकांच्या सर्व मागण्या वरिष्ठ कार्यालयाला सादर करून त्याची पूर्तता होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे मधुकर मातोंडकर यांनी सांगितले. यावेळी सुरेश गावडे, प्रकाश वालावलकर,सातोसे माजी सरपंच वसंत धुरी, मोहन गवस, सागर गोठसकर, दिलीप गावडे, रामा परब, संतोष जाधव, अरुण परब आदींसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
                गाड्यांना थांबा हा राजकीय इश्यू
मडूरे स्थानकावर कोकणकन्या, तुतारी व मांडवी एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा यासाठी स्थानिकांनी आग्रही मागणी केली. यावर गाड्यांना थांबा मिळणे हा राजकीय इश्यू असल्याचे चिन्मय भंडारी यांनी सांगितले. यावरून राजकीय अनास्थेमुळे स्थानकावर गाड्यांना थांबा मिळालेला नाही हे स्पष्ट झाले.