देवगड : प्रतिनिधी
त्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सिंधुदुर्ग पथकाने घेतले ताब्यात
कामावरून घरी परत जाणाऱ्या पादचारी तरूणीची पिशवी हिसकावून मोबाईल व रोकड लंपास करून आपल्या ताब्यातील मोटरसायकल तेथेच टाकून पळ काढणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून ओरोस खर्येवाडी येथील बसस्टॉपजवळ २१ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता शिताफीने ताब्यात घेतले.सुर्यकांत अनंत चव्हाण(३९) रा.ओरोस खर्येवाडी असे संशयिताचे नाव असून चोरलेला मोबाईल व रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.चोरीची घटना ९ जानेवारी रोजी सायंकाळी ५.४५ वा.सुमारास आचरा मुणगे घाटीरस्त्यावर घडली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मुणगे तळीवाडी येथील प्रिया रामदास निकम(२५) ही युवती आचरा डोंगरेवाडी येथील सुनिल दुखंडे यांच्याकडे कामाला होती.दि. ९ जानेवारी रोजी सायंकाळी काम आटोपून मुणगे आचरा रस्त्यावरून घरी पायी चालत जात असताना येथील घाटीरस्त्यातील एका अनोळखी दुचाकीस्वाराने तिच्या हातातील पिशवी हिसकावली यावेळी प्रिया हिने आरडाओरड केल्याने संशयिताने दुचाकी घटनास्थळी टाकून पलायन केले होते.यावेळी त्यांनी हिसकावून नेलेल्या पिशवीमध्ये ८०० रूपयाची रोकड व ६ हजार रूपये किंमतीचा रेडमी कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल संशयिताने चोरून नेला होता याबाबत प्रिया हिने देवगड पोलिस स्थानकात तक्रार दिली होती त्या तक्रारीवरून संशयिताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली.हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी देवगड पोलिसांबरोबरच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक नियुक्त करण्यात आले होते.
या पथकाकडून गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना गुन्हा घडल्यापासून संशयित प्रत्येक ठिकाणे बदलुन पोलिसांना वारंवार गुंगारा देत होता.२० जानेवारी रोजी या गुन्ह्याचा तपासादरम्याने गोपनीय माहिती मिळाल्यावरून संशयित हा नालासोपारा, विरार, मुंबई येथुन खाजगी बसने ओरोस खर्येवाडी येथील बसस्टॉपवर उतरणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सापळा रचून २१ जानेवारी रोजी सकाळी ७ वा.सुमारास संशयित बसमधुन खाली उतरत असताना त्याला ताब्यात घेतले.यावेळी गुन्ह्यात जबरीने चोरून नेलेला मोबाईल व रोख रक्कम झडती करून ताब्यात घेतली.संशयिताला देवगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायलयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरिक्षक राजेंद्र पाटील, पोलिस उपनिरिक्षक समीर भोसले, पो.हे.कॉ.डॉमनिक डिसोझा, सदानंद राणे, बस्त्याव डिसोझा व आशिष जामदार यांच्या पथकाने केली. गुन्हयाचा तपास पोलिस उपनिरिक्षक संतोष भालेराव करीत आहेत.






