कणकवली (प्रतिनिधी)
भाजप शिवसेना महायुतीचे नितेश राणे आणि महाविकास आघाडीचे संदेश पारकर यांच्यात मुकाबला रंगणार
दोन अपक्षांची माघार ; नवाज खाणी, संदेश परकर किती मते फोडणार याबाबत राजकीय तर्क-वितर्क
विधानसभा मतदार संघातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप शिवसेना महायुतीचे नितेश राणे आणि महाविकास आघाडीचे संदेश पारकर यांच्यात थेट मुकाबला होणार आहे. तर बसपाचे प्रकाश जाधव यांच्यासह अपक्ष उमेदवार नवाज खानी आणि संदेश परकर हे कोणाची किती मते फोडणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी विश्वनाथ कदम आणि प्रकाश नारकर या दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आणि संदेश पारकर यांना पाठिंबा जाहीर केला.
कणकवली मतदारसंघात तुल्यबळ लढतींसाठी महायुतीचे आमदार नितेश राणे आणि महाविकास आघाडीचे संदेश पारकर यांनी कंबर कसली आहे. गावनिहाय बैठका घेऊन या दोघांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. तर एकगठ्ठा मते फोडण्यासाठी नवाज खानी आणि संदेश परकर या अपक्ष उमेदवारांची भूमिका महत्वाची मानली जात आहे. याखेरीज बहुजन समाजवादी पार्टीचे प्रकाश जाधव हे देखील किती मते आपल्या पारड्यात वळवतात यावर कणकवली मतदारसंघातील विजयी उमेदवाराचे मताधिक्य ठरणार आहे.
कणकवली विधानसभा मतदारसंघात आता सहा उमेदवार निश्चित झाले आहेत. यामध्ये भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे, उबाठा शिवसेना मविआचे उमेदवार संदेश पारकर, अपक्ष उमेदवार गणेश माने, बंदेनवाज खानी, संदेश परकर व बहुजन समाज पक्षाचे चंद्रकांत जाधव यांचा समावेश आहे.





