वैभववाडी (तुषार शिंगाडे)
कोकणात बांबू तोडीला जोर येणार ! सणा सुदीच्या काळात बांबू ठरणार आधार
कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात बांबू तोडीला सुरुवात झाली आहे. तोड कामगार भात लागवडीतून मोकळे झाल्याने कोकणात बांबू तोडीने वेग घेतला आहे.कोकणात या दिवसात पैशाची चणचण असते.त्यामुळे पुढे येणाऱ्या सणा सुदिच्या काळात बांबू आधार ठरला आहे.
कोकणातील शेतकऱ्यांना रोख पैसे मिळविण्याचे एक मेव साधन हे बांबू हे आहेत.दुसरं कोणतेही या दिवसात साधन नाही
कोकणातून दिवसेंदिवस बांबूची मागणी वाढतच आहे.अवेळी पडणारा पाऊस हा आंबा आणि काजू पिकाचे नुकसान करीत असल्याने शेतकरी बांबू लागवडीकडे वळले आहेत.ज्याच्या घराच्या आसपास बांबूच्या बेटी आहेत.त्यांना सण ,उत्सव, काळात बांबू विक्रीतून आर्थिक आधार मिळत आहे.कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात बोरबेट,सोन चिवा,माणगा, या स्थानिक प्रजातींच्या दर्जेदार बांबूला मोठी मागणी आहे.
वैभववाडी तालुक्यातील दर्जेदार बोरबेट बांबूने मार्केट मध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे.हा बांबू सर्वोत्कृष्ट ठरला आहे .या बांबूला सर्वात जास्त मागणी आहे. कोकणातील बांबू सांगली, मिरज,लातूर कर्नाटक,मुंबई या परिसरात पाठविले जातात.भांडी वळणे,बांधकाम आणि भाजी लागवडीला आधार देण्यासाठी बांबूचा वापर केला जात आहे.
कोकणातील कडेकपारी कसदार जमीन,प्रचंड पाऊस या मुळे बांबू दर्जेदार आणि टिकाऊ होतो म्हणून येथील बांबूला मोठी मागणी आहे. बांबूला दरही बऱ्यापैकी मिळत आहे. अडचण आणि रस्त्यापासून दूर असलेल्या बांबूला कमी दर मिळत आहे.
राजापूर,वैभववाडी,कणकवली, कुडाळ,सावंतवाडी या भागात मोठ्या प्रमाणात बांबूची तोड सुरु झाली आहे.पावसाळ्यात बांबू तोडायचे नसतात.नवे कोंब येतात. ते जोखीम घेत नाही पाऊस आता हळू हळू काढता पाय घेत आहे. पावसाने उसंत घेतल्याने बांबू तोडीने वेग घेतला आहे.कामगारांचे तोडीचे दर शेकडा एक हजार रुपये आहेत.ही एकमेव शेती अशी आहे की तो मुंबईचा चाकरमानी असला तरी तेथे बसून सर्व काही हाताळत आहे आणि बांबू तोडीतून आलेले पैसे बॅंकेत ट्रान्सफर करून घेत आहे. कोकणात आर्थिक सुबत्ता यायची असेल तर बांबू लागवड ही एकमेव पर्याय ठरली आहे.





