कणकवली : कनेडी येथे झालेल्या भाजप – शिवसेना पक्षाचा कार्यकर्त्यांमधील राडा प्रकरणी दोन्ही पक्षाच्या दहा कार्यकर्त्यांवर अटकेची कारवाई करण्यात आली तर आम. वैभव नाईक, सतीश सावंत, सुशांत नाईक, कन्हैया पारकर यांना अटक होण्याची शक्यता आहे. तशा हालचाली देखील पोलिसांकडून सूरु झाल्या आहेत.
अटक झाली तर मी अटक करून घेणार असे आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले आहे. आयपीसी ३०७ मधील दोन्ही गुन्ह्यातील एकूण ६ तर आयपीसी ३५३ मधील ४ आरोपींना कणकवली पोलिसांनी मध्यरात्री अडीज वाजण्याच्या सुमारास अटक केली.
सदर अटकेच्या कारवाईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मंगेश रामचंद्र सावंत, कृणाल विजय सावंत, योगेश रमाकांत वाळके, श्रीकांत नारायण सावंत, राजेश मधुकर पवार या पाच आरोपींना कणकवली पोलिसांनी अटक केली आहे.
तर भाजपच्या निखिल प्रकाश आचरेकर, अनिल राजाराम पांगम, संतोष वसंत आग्रे, संदीप बाळकृष्ण गावकर, तुषार श्यामसुंदर गावकर या पाच जणांना कणकवली पोलिसांनी अटक केली आहे.
कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सागर खंडागळे, पीएसआय वृषाली बर्गे यांच्या नेतृत्वाखाली ही अटकेची कारवाई करण्यात आली. आता बाकीच्यांना केव्हा अटक होते ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.





