दोडामार्ग येथे ९ फेब्रुवारीला महाराष्ट्र मिलेट मिशन व कृषी प्रक्रिया प्रतिपूर्ती कार्यक्रम…!

दोडामार्ग : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्षानिमित्ताने महाराष्ट्र मिलेट मिशन व कृषी प्रक्रिया प्रतिपूर्ती कार्यक्रम दिनांक ९ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता दिपकभाई केसरकर महाविद्यालय दोडामार्ग येथे कृषी विभाग महाराष्ट्र शासन मार्फत आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी तृणधान्य आधारीत पाक पदार्थांचे प्रदर्शन महिला बचत गटामार्फत भरवले जाणार आहे. तसेच सध्याच्या व्यस्थ जीवनशैलीत मनुष्याची आहार पद्धती ही आरोग्य वर्धक असणे आवश्यक आहे. यासाठी रोजच्या आहारामध्ये तृणधान्य युक्त पदार्थांचा समावेश करावा यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन यावेळी करण्यात येणार आहे.

याप्रसंगी दोडामार्ग तालुक्यातील प्रधानमंत्री सूक्ष्मअन्न प्रक्रिया अंतर्गत पात्र शेतकरी उपस्थित राहणार आहेत. तसेच योजनेच्या अधिक माहितीसाठी सर्व शेतकरी, प्रक्रियादार यांनी सदर कार्यशाळेला उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी बनकर यांनी केले आहे.