लोककला अनुदान शिफारस समितीवर निवड झाल्याबद्दल तुषार नाईक यांचा मडुरेत सत्कार…!

बांदा : महाराष्ट्र राज्य शासनाच्या लोककला अनुदान शिफारस समिती सदस्यपदी नाईक मोचेमाडकर दशावतार मंडळाचे संचालक तुषार नाईक यांची निवड झाली आहे. त्याबद्दल मडुरा ग्रामस्थांतर्फे देवस्थान समिती अध्यक्ष आनंद परब यांच्या हस्ते तुषार नाईक यांचा सत्कार करण्यात आला.

मडुरा माऊली मंदिर सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमाला देवस्थान समितीचे पदाधिकारी संतोष परब, सोमनाथ परब, विजय परब, दत्ताराम परब, बाळू गावडे, श्री. गुरव, नारायण जाधव आदी उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना तुषार नाईक म्हणाले, मडुरा गावाने मला विशेष प्रेम दिले आहे. लोक कलावंतांच्या कलापथकांना प्रयोग अनुदान मंजूर करण्यासाठी शासन निर्णयानुसार समिती गठीत करण्यात आली आहे. दशावतार लोककलेसाठी माझ्यासह देवेंद्र नाईक यांची नियुक्ती झाली आहे. लोककलांना उत्तेजन देणे हा मुख्य उद्देश असून समितीच्या माध्यमातून दशावतार कलेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणार असे स्पष्ट केले. सुत्रसंचलन व आभार पोलीस पाटील नितीन नाईक यांनी मानले.