रोणापाल गावातील तरुणांनी ध्यास घेतला गावाच्या सर्वांगीण विकासाचा…!

सावंतवाडी : तालुक्यातील निसर्गाच्या हिरवाईने नटलेले रोणापाल हे गाव. इथली सगळी लोक अगदी गोडी गुलाबीने वावरताना पाहायला मिळतील. याच गावातील तरुणांनी ध्यास घेतला तो मात्र गावाच्या सर्वांगीण विकासाचा. गावात एकोपा कायम राहावा यासाठी तरुण मंडळी नेहमीच अनेक उपक्रम गावात राबवित असतात. यातच सटेश्वर कला क्रीडा मंडळ गेली १० वर्षे क्रिकेट सामन्यांचे आयोजन करत आली आहे. यावर्षी त्यांनी ११ व्या पर्वात पदार्पण केलं. गेली १० वर्षे क्रिकेटचे सामने भरवले जातात आणि बक्षिसांची लयलूट केली जात असणार अशी धारणा सर्वांचीच झाली असणार.

परंतु प्रत्यक्षात मात्र इथे थोडं वेगळं पाहायला मिळत. २०१३ मध्ये या मंडळाने क्रिकेट स्पर्धा भरवायला सुरुवात केली. या स्पर्धेतील रकमेचा वापर केवळ नी केवळ सामाजिक कार्यासाठीच वापरला जावा अशी धारणा गावातील सर्व युवकांची होती. यातून पुढे सुरू झाली सामाजिक बांधिलकी. या मंडळाने सटेश्वर शेड, गावातील रस्ता, एका आजारी मुलाला दिलेला मदतीचा हात, गणेश विसर्जनासाठी निर्माण केलेली गणेश कोंड, मुलांनी शालेय उपक्रमात, क्रीडा प्रकारात केलेल्या कामगिरीचा केलेला गौरव असेल असे अनेक उपक्रम राबविले.

हे शक्य झालं ते मात्र गावाच्या एकोप्याने. हाच एकोपा जिल्ह्यातील सर्व युवकांना निश्चितच लाखमोलाचा ठरणारा आहे. युवकांची ताकत नेमकी कश्यात आहे हे या मंडळाने दाखवून दिलंय. अश्या या सामाजिक जाण असलेल्या मंडळाला अनेक शुभेच्छा.